गोंदिया : गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असून आदिवासीबहूल क्षेत्र अधिक आहे. राज्यामध्ये कीटकजन्य आजाराच्या दृष्टीने चार अतिसंवेदनशील जिल्हे राज्य शासनाने घोषित केले आहे. त्यामध्ये गोंदिया हा एक जिल्हा असून १ जूनपासून कीटकजन्य आजाराबाबत जनजागृतीसाठी विशेष मोहिम सुरु होत आहे. यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासन सज्ज असून सहकार्याशिवाय ही मोहीम यशस्वी करणे अशक्यच आहे. म्हणून आपण सर्व एकत्रित येवून सर्वांच्या सहाकार्याने हिवताप संपवू या, असे आवाहन सभेचे प्रभारी अध्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीश कळमकर यांनी केले.जिल्हास्तरीय एकात्मिक हिवताप नियंत्रण सभा शनिवारी पार पडली. यात ते उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते.यावेळी कीटकजन्य आजाराबाबत २५ एप्रिल २०१५ रोजी जागतिक हिवताप दिनानिमित्त हिवताप जनजागृती रॅलीचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल आकृती थिंक टुडे बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गुडधे व त्यांच्या सहकाऱ्यांचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिष कळमकर व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सलील पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आले.जिल्ह्यातील हिवताप रुग्ण संस्थेवर प्रभावी नियंत्रण मिळविण्याकरिता जिल्हास्तरीय एकात्मिक हिवताप नियंत्रण समितीची मानसूनपूर्व दुसरी सभा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सभाकक्षामध्ये सभेचे प्रभारी अध्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीश कळमकर यांच्या अध्यक्षतेत पार पडली. या वेळी सभेला जिल्हा शल्य चिकित्सक तथा सदस्य डॉ. रवी धकाते, जिल्हा हिवताप अधिकारी तथा सचिव डॉ. सलील पाटील, आकृती थिंक टुडे बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष तथा सदस्य प्रमोद गुडधे, संस्थेचे सदस्य लोकेश भोयर, दर्पण वानखेडे, आरोग्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा सदस्य डॉ. जगन्नाथ राऊत, लॉयन्स क्लबचे कॅबिनेट पदाधिकारी तथा सदस्य राजेंद्रसिंग बग्गास, रोटरी क्लबचे अध्यक्ष तथा सदस्य आशा ठाकूर आदी उपस्थित होते.सदर सभेमध्ये घ्यावयाची काळजी, त्यावर उपाय व नियोजन या विषयावर चर्चा करण्यात आली. प्रास्ताविक जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सलील पाटील यांनी केले. या वेळी त्यांनी कीटकजन्य आजाराच्या जनजागृतीपूर्व तयारीचे नियोजन व कार्यक्रमाविषयी माहिती दिली. चर्चेमध्ये गावपातळीवर कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना आरोग्य शिक्षणाविषयी माहिती व्हावी याकरिता मेळावे, अतिसंवेदनशील गावामध्ये फवारणी पूर्वी संस्थेमार्फत प्रसिद्धिपत्रके घरोघरी वाटप करणे व गावात फवारणीच्या दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचत गट यांची सभा घेणे, गावात व्हॅटपाईपला जाळ्या बसविणे, विशेष समाज कल्याण अधिकारीमार्फत सर्व शाळांच्या माध्यमातून रॅलीद्वारे जनजागरण करणे, तालुकास्तरावर डॉक्टरांचे प्रशिक्षण आयोजित करणे, गावकऱ्यांना आरोग्य शिक्षण देवून कंटेनर सर्वेक्षण, वैयक्तिक सर्र्वेक्षणाकरिता मच्छरदानीचा वापर याबाबत जनजागृती करणे या सर्व विषयांवर सखोल चर्चा करुन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. या वेळी कीटकजन्य आजार संपविण्याचा संकल्प करण्यात आला. संचालन भालेराव, आभार आरोग्य पर्यवेक्षक कुंभरे यांनी मानले. (प्रतिनिधी)
सर्वांच्या सहकार्याने हिवताप संपवू
By admin | Updated: May 18, 2015 00:55 IST