साखरीटोला : मागील सरपंचाच्या कार्यकाळात देशी दारू दुकान सुरू करण्यासाठी ग्राम पंचायतद्वारा नाहरकरत प्रमाणपत्र देवून विशेष ग्रामसभेचा ठराव देण्यात आला होता. त्यामुळे गावकऱ्यांनी या विरोधात मोठा आक्रोश व्यक्त केला होता. मात्र त्याचे काही झाले नाही. शेवटी नवीन सरपंचाच्या कार्यकाळात मागील ठराव रद्द करून दारू दुकानाला नाहरकत देण्याचा प्रस्ताव रद्द करण्यात आला. सदर घटना सालेकसा तालुक्यातील कारूटोला येथील आहे. मागील सरपंचाच्या कार्यकाळात पारित केलेला ठराव रद्द करून दारू दुकानाला परवानगी देण्यात येवू नये अशी मागणी जिल्हाधिकारी तसेच मंत्रालयापर्यंत करण्यात आली होती. पण त्याचा काहीच परिणाम झाला नव्हता. मात्र ग्राम पंचायतच्या निवडणुका नव्याने झाल्यानंतर नवीन सरपंच, उपसरपंच व सदस्य निवडून आले. हिच संधी साधून सर्व गावकरी आणि ग्रा.पं.च्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी १५ आॅगस्टला स्वतंत्र्य दिनाच्या शुभ पर्वावर एकत्र येवून ग्रामसभेच्या माध्यमातून दारूबंदीकरिता पुढे सरसावून दारूबंदीचा ठराव पारित केला. ११ सदस्यसंख्या असलेली गट ग्रामपंचायत कारूटोला अंतर्गत चिचटोला, तेलीटोला, दागोटोला, सलंगटोला, हेटीटोला, तुमडीटोला या गावांचा समावेश आहे. दिनांक १६ जून २०१४ ला एस.ए. जायस्वाल यांना ग्रा.पं. क्षेत्रात सरकारमान्य देशी दारू दुकान सुरू करण्याकरिता तत्कालीन ग्रामपंचायतने नाहरकत ठराव दिला होता. त्यानुसार सदर दुकानदाराने साकरीटोला-सातगाव मार्गावर सदर दुकानाचे बांधकाम सुरू केले. मात्र याविरोधात संतापलेल्या गावकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. संधी मिळताच १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी मोठ्या संख्येत हजेरी लावून ग्रा.पं.च्या पटांगणावर घेण्यात आलेल्या ग्राम सभेत मागील ठराव रद्द करून दारू दुकानाची परवानगी रद्द करावी व ग्रा.पं. क्षेत्रात कोणतेही ठिकाणी देशी दारू दुकान उघडण्यात येवू नये, असा ठराव सर्वसंमतीने घेण्यात आला. यात कांतीलाल येटरे हे सूचक असून भिमराज बोहरे यांनी अनुमोदन केले. यावेळी सरपंच राया फुन्ने, उपसरपंच नंदु चुटे, ग्रा.पं.सदस्य, ग्रामसेवक सुरेश वाघमारे, गावकरी प्रभू थेर, हरी कटरे, बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (वार्ताहर)
कारुटोल्यातील ग्रामसभेने रद्द केला दारू दुकानाचा प्रस्ताव
By admin | Updated: August 22, 2015 00:13 IST