हरदोलीत रास्ता रोको : महिला रस्त्यावर, संजय पुराम यांची मध्यस्थीसाखरीटोला : सोनारटोला येथील आरती बारसे या विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध पोलीस विभागाने कडक कारवाई करावी व तिच्या कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी ग्रामवासी, भाजप महिला मोर्चा व देवरी तालुका महिला आयोगाच्या कार्यकर्त्यांनी हरदोली येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पोलिसांविरूद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान आ.संजय पुराम यांनी मध्यस्थी करीत या प्रकरणाची गुप्तचर खात्यामार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिले.सकाळी १० वाजता हरदोली येथे रस्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार संजय पुराम यांच्या पत्नी व माजी महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी केले. आमदार संजय पुराम यांनी आंदोलनकर्त्या महिलांना सीबीआय चौकशी होईल अशी हमी देवून आंदोलन समाप्त करण्यासाठी मध्यस्थीतीची भूमिका निभावली. त्यामुळे अर्ध्या ते पाऊण तासात आंदोलन गुंडाळण्यात आले.मागील महिन्याच्या १८ तारखेला आरतीचा खून करण्यात आला होता. परंतु पोलीस विभागाने सदर प्रकरणात आत्महत्येचा गुन्हा दाखल केल्याने नागरिकांध्ये पोलिसांविषयी रोष निर्माण झाला आहे. त्यातूनच आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा व कडक कारवाई व्हावी, सदर प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यासाठी महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. देवरी साखरीटोला मार्गावरील हरदोली येथे हरदोली-मांडोदेवी चौकात शेकडो महिला व पुरुष एकत्र आले. सकाळी १०.३० च्या दरम्यान सोनाटोल्यावरुन सदर चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने पोलिसांनी हरदोली येथे मोर्चा अडविला. मोर्चा अडविताच महिला आक्रमक झाल्या व पोलिसांविरुद्ध नारेबाजी करु लागल्या. भारतीच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे. पोलिसांनी योग्य दिशेने तपास न करता आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पोलिसांवर आमचा विश्वास नाही अशी भूमिका मांडून या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करु लागल्या. अतिरिक्त पोलीस अधीक्षक पखाले यांच्या सोबत आमदार संजय पुराम यांनी घटनास्थळाला भेट देवून आंदोलनकर्त्यांना सीबीआय चौकशी होईल, मी जनतेसोबतच आहो, आरती ही माझ्या मुलीसारखीच आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपींना योग्य ती शिक्षा होईल, असे आश्वासन दिल्याने मोर्चेकरी शांत झाले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी १५ दिवसांची मुदत दिली व त्यानंतर पुन्हा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. सीबीआय चौकशी होणार?आंदोलनादरम्यान आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार यांनी महिलांची समजूत काढून आपली सीबीआय चौकशी करण्याची मागणी मी केंद्र शासनाकडे लावून धरेल व सीबीआय चौकशी करण्यासाठी शासनाला विनंती करेल. पण त्यासाठी वेळ लागेल, धीर धरा, न्याय मिळेल हे नक्की. पोलीस तपास योग्य दिशेने सुरु आहे, अशी भूमिका पुराम यांनी मांडली. पत्नी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे तर पती शासनाची भूमिका घेत तपास दिलासा देत असल्याचे चित्र पहायला मिळाले.महिला झाल्या आक्रमयावेळी पोलिसांनी मोर्च्यात सहभागी महिला व पुरुषांना रस्त्याच्या बाजूला हटविण्याचा प्रयत्न करताच महिलांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेऊन ये-जा करणाऱ्या वाहनांना अडविणे सुरु केले. त्यामुळे अर्धा तास वाहतूक ठप्प पडली होती. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांनी आंदोलनकर्त्यांना शांत करुन पोलीस विभाग योग्य दिशेने तपास करीत असून एक स्पेशल टीम तयार केली आहे व महिला पोलीस अधिकारी या टीमचे नेतृत्व करीत असल्याचे सांगून आरोपीला कडक शिक्षा व्हावी याकरीता योग्य ते पुरावे गोळा करण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले.
‘आरतीच्या कुटुंबीयांना न्याय द्या’
By admin | Updated: September 6, 2015 01:34 IST