विद्यार्थ्यांची पालिकेत धडक : प्रशासकीय अधिकाऱ्यांपुढे वाढला तक्रारींचा पाढागोंदिया : पालिकेच्या शाळा ओस पडत असतानाच शहराच्या गोविंदपूर भागातील नगर पालिकेच्या शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना अमानुषपणे काडीने चोप देण्यासोबत थेट टीसी देण्याची धमकी देतात. रोजरोजच्या या प्रकाराला त्रासून कंटाळून शाळेतील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (दि.२१) नगर परिषद कार्यालय गाठून शाळेत घडणाऱ्या प्रकाराची कैफित प्रशासकीय अधिकाऱ्यांपुढे मांडली. यानिमित्ताने पालिकेच्या शाळांतील एकूणच खेळखंडोबा पुढे आला. गोविंदपूर नगर परिषद शाळेत परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. मात्र या शाळेत विद्यार्थ्यांना सुविधा पुरविल्या जात नाहीत. काही विषयांचे शिक्षकच नसल्याने त्या विषयांचे वर्गच होत नसल्याचे दिसून आले. पावसाचे पाणी वर्गात गळते. पंखे तुटलेले किंवा नादुरूस्त आहेत. अशा प्रकारच्या विविध समस्यांनी ही शाळा ग्रस्त आहे. विद्यार्थ्यांनी या सर्व विषयांवर मुख्याध्यापक विजय शर्मा यांना सांगितले. मात्र त्यांनी काहीच केले नाही. परिणामी शाळेतील सुमारे २५-३० विद्यार्थ्यांनी नगर परिषद कार्यालय गाठले. कार्यालयात विद्यार्थ्यांनी प्रशासकिय अधिकारी सी.ए.राणे यांच्यापुढे शाळेत घडणाऱ्या प्रकारांचा पाढाच वाचला. सुविधांचे तर सोडाच, मात्र शाळेतील पर्यवेक्षक अनुराग तिवारी हे विद्यार्थ्यांना शिकवायचे सोडून घरच्या गोष्टी सांगतात. शाळेतील प्रकार कुणालाही सांगितल्यास टीसी हातात देण्याची धमकावणी देतात, तसेच विद्यार्थ्यांना काडीने मारहाण देखील करीत असल्याचे विद्यार्थ्यांनी राणे यांना सांगितले. आपले कोणीच काही बिघडवणार नाही, अशा तोऱ्यात ते वावरत असल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यामुळे विद्यार्थी धास्तावलेले असून त्यांना शाळेत जाणे नकोसे झाले आहे. मात्र पर्याय नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून होत असलेला अन्याय तोंड बंद करून सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे शाळेतील सर्वच विद्यार्थी पालिकेच्या कार्यालयात येणार होते, मात्र तिवारी यांच्या भितीमुळे ते आले नसल्याचेही विद्यार्थ्यांनी याप्रसंगी सांगितले. याप्रकरणी संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी उपस्थित नगरसेवकांनी केली. (शहर प्रतिनिधी)विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून सारेच अवाकनगर पालिकेच्या कार्यालयात धडक दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या मांडल्या त्यावेळी नगरसेवक राजेश बघेल व नगरसेवक सुषमा मेश्राम यांचे पती मयुर मेश्राम प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या कक्षात उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून त्यांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी याप्रकरणी संबंधित शिक्षकांवर त्वरित कारवाई करण्याची मागणीही केली.
नगर परिषदेत शिक्षणाचा खेळखंडोबा
By admin | Updated: August 22, 2015 00:08 IST