अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील पिंपळगाव येथील अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबातील सूरज संतोष उके याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्राणिशास्त्र विषयात एम.एस्सी.मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरमधून द्वितीय क्रमांक पटकावला असून, तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे.
सूरजचे वडील संतोष उके व आई सविता उके यांनी लहानपणापासूनच सूरजच्या शिक्षणासाठी अपार कष्ट केले. निसर्गाच्या कृपेवर शेतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या मिळकतीवर समाधान मानत सूरज खूप मोठा व्हावा, त्याने चांगले शिक्षण घ्यावे, असे स्वप्न आई-वडिलांनी पाहिले होते. सूरजने शासकीय विज्ञान संस्था नागपूर येथून प्राणिशास्त्र विषयात एम.एस्सी. केले आहे. तसेच त्याने चारही सत्रांमध्ये महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. त्याला एम.एस्सी.मध्ये ८३.४३ टक्के गुण मिळाले असून, आपल्या यशाचे श्रेय त्याने आई-वडील व शासकीय विज्ञान संस्थेच्या प्राणिशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक व संस्थेच्या प्रमुखांना दिले आहे. सूरजने बी.एस्सी.पर्यंतचे शिक्षण अर्जुनी मोरगाव येथील एस.एस.जे. महाविद्यालय येथे पूर्ण केले आहे. तसेच सूरज सत्र २०१५ चा ॲवार्ड अँड अचिव्हमेंट इन्स्पायरचा शिष्यवृत्तीधारक असून, त्याने आपले बारावीपर्यंतचे सर्व शिक्षण शिष्यवृत्तीमधून पूर्ण केले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्याने मिळविलेले हे यश इथेच थांबणार नसून, आपला वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक बळकट करण्याचे त्याने ठरविले आहे. विज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी इन्स्पायर नावाची शिष्यवृत्ती आहे हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसल्यामुळे बौद्धिक क्षमता असतानाही केवळ पैशाच्याअभावी बरेच विद्यार्थी आपले करिअर घडवू शकत नाहीत, म्हणून या प्रकारची माहिती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे असे आपल्या यशाचे गमक सांगताना सूरज म्हणाला. ग्रामीण क्षेत्रातील सूरजच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, नागपूर विद्यापीठाच्या १०८ व्या दीक्षांत समारोहात सूरजला सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.