गोंदिया : बहुप्रतीक्षित डांगोरली बॅरेजचा प्रस्ताव आमदार विनोद अग्रवाल यांनी शासनाला सादर केला आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातच त्यांनी जिल्ह्याच्या आढावा बैठकीत डांगोरली बॅरेजचा मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर लावून धरला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश दिले होते.
डांगोरली बॅरेज हा आंतरराज्य प्रकल्प असून, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेतून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पात्रात डांगोरली येथे उच्चपातळी बंधारा निर्माण करून बांधण्यात येणार आहे. आमदार अग्रवाल यांनी या बॅरेजची उंची ८ मीटर ठेवण्यासंबंधी आग्रह केला होता. ज्यामुळे तेढवा-सिवनी व नवेगाव-देवरी उपसा सिंचन योजनेचे बळकटीकरण होणार आहे.
डांगोरली बॅरेजमुळे उपलब्ध पाणीसाठा १०.९१ एमएमक्यूब राहणार असून, हजारो हेक्टर शेतजमिनीच्या सिंचन प्रकल्पांचे बळकटीकरण होण्यास मदत मिळणार आहे.
मात्र कोरोनामुळे बहुप्रतीक्षित डांगोरली बॅरेजचा विषय पूर्णत्वास जाऊ शकला नाही. अखेर आमदार अग्रवाल यांनी हा मुद्दा लावून धरत नागपूर सिंचन भवन येथे सिंचन विभागाच्या २४ डिसेंबरच्या बैठकीत प्रस्ताव मांडला होता. काही दिवसांपूर्वी बॅरेजचा पाठपुरावा करण्यासाठी आमदार अग्रवाल यांनी मुंबई येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली होती. तसेच जलसंपदा विभागाचे सचिव विजय गौतम यांची भेट घेऊन मंजुरी देण्याची मागणी केली होती. अखेर बहुप्रतीक्षित डांगोरली बॅरेजचा प्रश्न मार्गी लागणार असून, क्षेत्रातील कृषी तसेच पिण्याच्या पाण्याचा उद्भवणारा प्रश्न सुटणार आहे.
------------------------
उपसा सिंचन योजनांचे होणार बळकटीकरण
डांगोरली बॅरेजमुळे गोंदिया विधानसभा क्षेत्रातील नवेगाव-देवरी व तेढवा-सिवनी उपसा सिंचन योजनेचे बळकटीकरण होणार असून, याचा फायदा रब्बी पिकांसाठी घेता येईल व हजारो हेक्टर शेतीला याचा फायदा होईल. सोबतच महाराष्ट्र व मध्यप्रदेशला जोडणाऱ्या जुन्या वाघनदीच्या पुलामध्ये २ मीटर भराव टाकल्यास रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेचे बळकटीकरण होईल व त्यासाठी स्वतंत्र बंधारा बांधण्याची गरजच भासणार नाही. यामुळे शासनाचा पैसादेखील वाचेल, असे आमदार अग्रवाल यांनी निदर्शनास आणून दिले. विशेष म्हणजे, उन्हाळ्यात नदीपात्र कोरडे होत असल्याने पाण्याची पूर्तता होऊ शकत नाही. त्यावर उपाय म्हणून सध्या पुजारीटोला धरणातून नदीत पाणी सोडून त्या पाण्याचा उपसा डांगोरली येथून केला जातो. डांगोरली बॅरेज तयार केल्याने कोणत्याही इतर धरणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता पडणार नाही व एकमेव डांगोरली बॅरेज येथून पाण्याचा पुरवठा संपूर्ण गोंदिया शहराला केला जाणार आहे. ज्यामुळे उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी गोंदिया शहरातील नागरिकांना उपलब्ध होणार आहे.