आमगाव : आपत्ती ही कधी सांगून येत नाही. आपत्तीचे स्वरूप मोठे किंवा लहान असले, तरी त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पूर्वनियोजन करणे आवश्यक आहे. प्रशिक्षण व जनजागृती या आपत्ती व्यवस्थापनातील दोन बाजू आहेत. आपत्तीच्या काळात जनजागृती व दक्षता या शस्त्रांचा वापर करून पूर परिस्थितीवर मात करता येईल, असे प्रतिपादन जिल्हा शोध व बचाव पथकप्रमुख किशोर टेंभुर्णे यांनी केले.
तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या मान्सूनपूर्व पूरपरिस्थिती शोध व बचाव प्रशिक्षणात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. प्रात्यक्षिक वाघनदीमध्ये दाखविण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार सीमा पाटणे, शिशुपाल पवार, एस.एम. नागपुरे, तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव, पोलीस निरीक्षक श्यामराव काळे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष जाधव, महावितरणचे उपविभागीय अभियंता विष्णुपाल बोरकर उपस्थित होते. याप्रसंगी पाटणे यांनी, तालुक्यातील नदीकाठावर असलेल्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणे गरजेचे आहे. त्याकरिता नियुक्त केलेल्या क्षेत्र अधिकाऱ्यांनी मुख्यालयात राहून पूर परिस्थितीची माहिती तत्काळ वरिष्ठांना देणे आवश्यक आहे. आपत्तीच्या वेळेस नागरिकांमध्ये प्रशिक्षण व जनजागृतीची माहिती नसल्यामुळे आपत्ती काळात नुकसानीचे प्रमाण वाढते. तसेच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन जनजागृती केल्यास त्याचे प्रतिसाद समाजापुढे येतील व पूर परिस्थितीत जीवित व वित्तीयहानी कमी करण्यास मदत होईल, असे सांगितले. तसेच सजग नागरिक हा सुरक्षित नागरिक असतो, असे सांगून त्यांनी पुराचे प्रकार, पूर येण्याची कारणे, धरणातून पाणी सोडण्याची पूर्वसूचना, हवामान खात्याचे अंदाज इत्यादीबाबत सविस्तर माहिती दिली. शोध व बचावकार्य करताना घेण्यात येणाऱ्या आवश्यक दक्षतेसंदर्भात अनुभव सांगितले.
तसेच घरगुती टाकाऊ वस्तूपासून फ्लोटिंग डिव्हाइस तयार करून प्रात्यक्षिक दाखविले. या शोध व बचावकार्य प्रशिक्षण कार्यक्रमात मंडळ अधिकारी देवेंद्र काठाणे, आर.आय. बारसे, राजेंद्र रहांगडाले, तलाठी टेकराम बिसेन, प्रीती चंद्रिकापुरे, आशा बहेकार, विद्या वैद्य, पोलीस पाटील नर्मदा चुटे, संजय हत्तीमारे, सुरेश कोरे, किशोर दोनोडे यांच्यासह महसूल, पोलीस व वीज विभागातील अधिकारी-कर्मचारी, पोलीस पाटील व नागरिक उपस्थित होते.