राजेश मुनिश्वर - सडक/अर्जुनीसडक/अर्जुनी तालुक्यात २६ गावातील नाल्यावर बहुतेक ठिकाणी कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. मात्र त्यांच्या देखरेखी अभावी हे बंधारे आजघडीला भग्नावस्थेत आहेत.सडक/ अर्जुनी तालुक्यातील राका, सडक/अर्जुनी, दल्ली, बाम्हणी/खडकी, मनेरी, कनेरी, कोसमतोंडी, पांढरी, रेंगेपार, सिंदीपार, गोंगले, हेटी, गिरोला, पांढरवाणी, केसलवाडा, शेंडा, वडेगाव, जांभळी, दोडके, डव्वा, बिंद्राबन, खजरी, घोटी, मुरपार, माऊली, बोपाबोडी या गावात बंधाऱ्याची सोय शासनाने करून दिली. पण शासनाची योजना चालविणारे अधिकाऱ्यांचे नियोजन नसल्यामुळे बहुतेक बंधारे आजघडीला पांढरे हत्ती बनले आहेत. लाखो रुपये खर्च करून कोल्हापुरी बंधारे तयार करण्यात आले. या योजनेत व अधिकारी मालामाल झाले. पण शेतकऱ्यांचे शेतीचा सिंचनासाठी पाणी मिळाले नाही. शेतीच्या सिंचनाबरोबर पाळीव व जंगली प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली असती. पण त्या बंधाऱ्याजवळ १ फुट पाणी राहत नसल्याचे चित्र आजही पहावयास मिळत आहे. वडेगाव/सडक गावाजवळील काळा गोटा १ व काळा गोटा २ या ठिकाणी गेल्या १० वर्षापूर्वी दोन मोठे-मोठे बंधारे बंधाऱ्यात आले. ज्या दिवसापासून या बंधाऱ्याच्या पाट्या काढल्या. त्यानंतर त्या पूर्ण पाट्या चोरीला गेल्या. तेव्हापासून पुन्हा पाट्या लावण्यात आल्या नाही. या दोन्ही बंधाऱ्यामुळे केसलवाडा, पांढरवाणी, वडेगाव, रेंगेपार, डोयेटोला या गावातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय झाली असती पण अधिकाऱ्यांचे नियोजनाचे अभाव व नेत्यांचे दुर्लक्ष यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी अपयशी ठरली. योजनेत भ्रष्ट्राचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. कारवाई झाल्यास भ्रष्टाचाराचे प्रमाणही कमी होईल व ती योजना खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे हिताची होईल.राका येथील कोल्हापुरी बंधारा तालुक्यातील प्रथम क्रमाकांचा बंधारा म्हणून ओळखला जात होता. गेल्या काही वर्षापासून या बंधाऱ्यात पाट्या लावून दार बंद केल्या जात होते. त्यात १० ते २० फुट पाणी दरवर्षी साठवण राहात होते. गेल्या पावसाळ्यात चोरांनी पाट्या चोरल्यामुळे पाट्या लावल्या गेल्या नाहीत. या ठिकाणी नवीन पाट्या लावून पाणी अडवायला पाहिजे होते. पण पाट्या लावण्यास कोणताही अधिकारी धजावला नाही. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात नदीला पाणी अडवीले पाहिजे. पाट्या नसल्यामुळे यंदा राका बंधारा कोरडाच राहण्याचे चित्र दिसत आहे. राका येथील बंधााऱ्यामुळे सौंदड, राका, चिखली, पिपरी गावातील विहिरींना पाण्याचा स्तर वाढला होता. सध्या स्थितीत राका परिसरातील विहिरींचा जलस्तर खालवण्याची माहिती राजाराम ब्राह्मणकर या शेतकऱ्यांनी दिली. येणाऱ्या काळात पाण्याचा साठा वाढवायचा असेल तर तालुक्यातील सर्वच बंधाऱ्याची डागडूजी करून ते बंधारे विकासाचे प्रवाहात आणण्याची गरज आहे. कोल्हापुरी बंधाऱ्याची योजना शेतकऱ्यांसाठी फारच तारक आहे. या योजनेमुळे तालुक्यातील शेतकरी सुजलाम, सुफलाम होईल. खरीप व रबी पिके घेऊ शकतो, पण सिंचनाची सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा खालावत आहे.
२६ गावातील कोल्हापुरी बंधारे भग्नावस्थेत
By admin | Updated: November 30, 2014 23:07 IST