नरेश रहिले - गोंदियाकर्ज घेऊन कुटुंब चालविणारे शेतकरी दरवर्षी कर्जाची परतफेड करण्यास अपयशी ठरतात, यातूनच कर्जाला कंटाळून गोंदिया जिल्ह्यातील १५० शेतकऱ्यांनी मागील १३ वर्षात आत्महत्या केल्या आहेत.कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचे सावट जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर राहते. यामुळे सतत नापिकी होत असते. महागडी औषधी व बियाणे वापरून येणाऱ्या उत्पन्नातून कुटूंब सावरणे कठिण होत आहे. धानाला भाव शासनाकडून मिळत नाही. निवडणुका पाहून बोनस दिला जातो. निवडणुका संपल्या की शेतकऱ्यांच्या समस्यांकडे पाठ फिरविली जाते. मुलींचे लग्न, मुलांचे शिक्षण करण्यासाठी शेतकऱ्याला कर्ज घेतल्याशिवाय पर्याय नाही. कर्जातच जन्मलेल्या शेतकऱ्याला कर्जातच मरावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या धानाला भाव नसल्यामुळे राबूनही त्याला योग्य मोबदला मिळत नाही. परिणामी प्रत्येक काम त्याला कर्ज घेऊनच करावे लागते. एकदा घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येणे शक्य नाही आणि दुसऱ्या वर्षीही शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबतो. परिणामी तो आत्महत्येचा मार्ग पत्करतो. यामुळेच जिल्ह्यातील १५० शेतकऱ्यांनी १३ वर्षात आत्महत्या केल्या आहेत. सन २००२ मध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. सन २००३ मध्ये एक, सन २००४ मध्ये सहा, सन २००५ मध्ये सहा, सन २००६ मध्ये २२, सन २००७ मध्ये १९, सन २००८ मध्ये १८, सन २००९ मध्ये १२, सन २०१० मध्ये २२, सन २०११ मध्ये १३, सन २०१२ मध्ये १०, सन २०१३ मध्ये सहा तर सन २०१४ मध्ये १४ अशा एकूण १५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या १३ वर्षात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी ४४ शेतकऱ्यांना शासनाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्जापायी नसल्याचे सांगून त्यांच्या कुटुंबियांना मदतीपासून वंचीत ठेवले. १०५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्जापायी असल्याचे सांगीतले. तर एका शेतकऱ्याची आत्महत्या कर्जापायी आहे किंवा नाही याची पडताळणी शासन करीत आहे. कर्जापायी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह मदत म्हणून शासनातर्फे एक लाख रूपये देण्यात येते. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील कर्जापायी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झालेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना एक लाख रूपयाप्रमाणे एक कोटी पाच लाख रूपये या १३ वर्षात देण्यात आले आहेत. (तालुका प्रतिनिधी)
१३ वर्षांत केल्या १५० शेतकऱ्यांनी आत्महत्या
By admin | Updated: December 3, 2014 22:51 IST