पणजी : कूळ व मुंडकार दुरुस्ती कायद्यातील वादग्रस्त ‘सनसेट’ कलम रद्द केले जाणार आहे. तसा निर्णय मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या मंगळवारी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठीचे विधेयक याच अधिवेशनात मांडले जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. कूळ कायद्यात दोन वर्षांपूर्वी दुरुस्त्या करून अनेक आक्षेपार्ह कलमांचा समावेश करण्यात आला आहे. त्या सगळ्या दुरुस्त्या मागे घेतल्या जाव्यात म्हणून गोमंतक भंडारी समाज व बहुजन महासंघाची चळवळ सुरू आहे. तथापि, सरकार सर्व दुरुस्त्या मागे घेण्यास तयार नाही. सनसेट कलम रद्द करण्याविषयीचीच दुरुस्ती मागे घेतली जाणार आहे. यापूर्वीच्या नव्या दुरुस्त्यांनुसार कूळ व मुंडकारांचे खटले मामलेदारांकडून काढून ते दिवाणी न्यायालयांकडे सोपविण्यात आले आहेत. त्या दुरुस्त्या तशाच ठेवल्या जातील; पण तीन वर्षांत मालकीसाठी अर्ज करावेत, अशा प्रकारचे जे बंधन सनसेट क्लॉजद्वारे आले होते, ते आता रद्द ठरणार आहे. कंत्राट शेतीविषयीच्या एका तरतुदीतही दुरुस्ती केली जाणार आहे. पार्सेकर सरकार सनसेट कलम रद्द करणार, असे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’नेच दिले होते. कूळ कायद्यातील आक्षेपार्ह दुरुस्त्यांबाबतचेही पहिले वृत्त ‘लोकमत’नेच गतवर्षी दिल्यानंतर चळवळ सुरू झाली होती. (खास प्रतिनिधी)
याच अधिवेशनात होणार ‘सनसेट’ कलमाचा अस्त!
By admin | Updated: August 5, 2015 01:30 IST