पणजी : सीबीआय कोर्टाने लाच प्रकरणात राणे पिता-पुत्रांना अटकपूर्व जामीन अर्जावर २१ जुलैपर्यंत दिलासा दिला असून विश्वजित यांना कन्येच्या शिक्षणाच्या निमित्ताने तीन दिवस गोव्याबाहेर जाण्यास परवानगी दिली आहे. म्हापशातील सीबीआय न्यायालयात न्यायाधीश पी. व्ही. सावईकर यांच्यासमोर मंगळवारी राणे पिता-पुत्रांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुनावणीस आला असता या प्रकरणी तपासकाम करणाऱ्या एसआयटी पोलिसांच्या वतीने सरकारी वकील प्रसाद कीर्तनी यांनी उत्तरादाखल प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागितली. विश्वजित राणे याप्रसंगी जातीने उपस्थित होते. त्यांच्या वतीने बाजू मांडणारे मुंबईचे आघाडीचे वकील शिरीष गुप्ते यांनी आपल्या अशिलास मुलीच्या शिक्षणानिमित्त गोव्याबाहेर जावे लागणार असल्याने त्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली. न्यायाधीशांनी त्यासाठी विनंती अर्ज सादर करण्यास सांगितले आणि तो सादर केल्यानंतर तीन दिवसांची अनुमती देण्यात आली. दहेज मिनरल्स कंपनीकडे ६ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात एसआयटी पोलीस पथकाने राणे पिता-पुत्रांविरुध्द गुन्हे नोंदविले होते. त्यानंतर पिता-पुत्रांनी अटकपूर्व जामिनासाठी सीबीआय न्यायालयात धाव घेतली. न्यायाधीशांनी ५ जुलै रोजी त्यांना ८ जुलैपर्यंत अटक करू नये, असा सशर्त अंतरिम आदेश दिला होता. हा अंतरिम आदेश २१ जुलैपर्यंत कायम राहाणार असून तोपर्यंत या दोघांना दिलासा मिळालेला आहे. ५ जुलैच्या आदेशात काही अटी घालण्यात आल्या होत्या. त्यात गोव्याबाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. (प्रतिनिधी)
राणे पिता-पुत्रांना २१ पर्यंत दिलासा
By admin | Updated: July 9, 2014 01:05 IST