पणजी : ‘मगो’ पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची घुसमट होत आहे. गेली साडेतीन वर्षे आम्हाला हा अनुभव येत आहे. प्रशासनास गतीच नाही व त्यामुळे लोकांची कामे अडतात, असे ‘मगो’ पक्षाचे अध्यक्ष व पार्सेकर सरकारमधील मंत्री दीपक ढवळीकर यांनी बुधवारी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीवेळी सांगितले. प्रश्नोत्तराच्या रूपात मुलाखत खालीलप्रमाणे, प्रश्न : सरकारमध्ये ‘मगो’ची घुसमट होतेय, असे तुम्हाला वाटते का? त्यामागील कारणे कोणती? उत्तर : घुसमट खूप झाली आहे व होत आहे. आम्ही २०१२ साली भाजपशी युती केली होती, तेव्हा लोकांनी खूप अपेक्षा ठेवल्या होत्या; पण संथ प्रशासनामुळे लोकांची कामे होत नाहीत. मगोच्या कार्यकर्त्यांना विविध महामंडळांवर स्थान दिले जाईल, असेही आम्हाला सांगितले गेले होते; पण तो शब्द पाळला गेला नाही. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री होते, तेव्हा ते आम्हा सर्वांना सोबत घेऊन जात होते. विद्यमान मुख्यमंत्री पार्सेकर यांना अजून एक वर्षात काम करून दाखविण्याची संधी आहे. प्रश्न : पुढील निवडणुकीवेळीही तुमची भाजपशी युती होईल का? उत्तर : युतीबाबत अजून काही ठरलेले नाही. आम्ही ‘मगो’ची केंद्रीय समिती, पदाधिकारी, मतदारसंघातील समित्या यांच्याशी चर्चा करू व मग भाजपशी युतीबाबत बोलू. पर्रीकर मुख्यमंत्रिपदी दहा वर्षांसाठी असावेत व त्यांच्यासोबत ‘मगो’ पक्षही असावा, असे आम्हाला २०१२ साली वाटत होते. ‘मगो’-भाजप यांची एक समन्वय समिती असावी व त्या समन्वय समितीच्या सातत्याने बैठका व्हाव्यात, असेही ठरले होते; पण त्याविषयी काही घडले नाही. प्रश्न : सहकार खाते काढल्यानंतर तुम्ही पर्रीकर यांच्याशी बोलणी केली काय? उत्तर : मी पर्रीकर यांच्याशी चर्चा केली नाही; पण माझे सहकार खाते काढताना पर्रीकर यांनी मला एक आश्वासन दिले होते. तुम्हाला आपण २०१४ सालच्या माझ्या (म्हणजे पर्रीकरांच्या) वाढदिनापूर्वी काही तरी महत्त्वाचे देईन; पण पर्रीकर यांनी काही दिले नाही. प्रश्न : तुमची २०१७च्या निवडणुकीवेळी भाजपशी युती झाली नाही, तर ‘मगो’ स्वतंत्रपणे लढण्याएवढा समर्थ आहे? उत्तर : ‘मगो’ने गोव्यावर यापूर्वी १७ वर्षे राज्य केले आहे. तो अनुभव वाया जाणार नाही. तरीही गोव्याचा राज्यकारभार भाजप व ‘मगो’ने नेहमी एकत्रपणे चालवावा, असे आम्हाला वाटते. शेवटी पंतप्रधान मोदी, नितीन गडकरी व मनोहर पर्रीकर हे अंतिम निर्णय घेतील. ‘मगो’ पक्षाचे विविध मतदारसंघांमध्ये काम आहे. प्रश्न : माविन गुदिन्हो यांना दक्षिण गोव्याची पीडीए देण्यास तुमचा आक्षेप होता काय? उत्तर : आमचा त्या वेळीही विरोध होता व आताही विरोध आहे. सरकारने फेरविचार करायला हवा. गुदिन्हो हे काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांना भाजपने पीडीएचे चेअरमनपद देताना ‘मगो’ पक्षाला विचारलेदेखील नाही. सरकारचा तो निर्णय आम्हाला आवडलेला नाही.
‘मगो’ची सरकारमध्ये घुसमट!
By admin | Updated: December 31, 2015 02:23 IST