पर्वरी : पेन्ह द फ्रान्स पंचायतीच्या सरपंच व उपसरपंचावर मंगळवारी अविश्वास ठराव दाखल करून ६-५ मतांनी तो मंजूर करण्यात आला. या वेळी सहा पंचांनी ठरावावर सह्या केल्या. सह्या केलेल्यांत राधिका सावंत, उमेश फडते, घनश्याम नाईक, विश्रांती देसाई, सुभाष कळंगुटकर व राजेश वळवईकर यांचा समावेश आहे. इतर पंच सफर फडते, स्वप्नील चोडणकर, दीपाली वेर्णेकर, गजानन हळर्णकर व ब्लांच डिसोझा हेही या वेळी उपस्थित होते. गेल्या आॅगस्ट महिन्यात अलिखित करारानुसार, सफर फडते यांची सरपंचपदी, तर स्वप्नील चोडणकर यांची उपसरपंचपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, केवळ तीन महिन्यांच्या कालावधीत सरपंच व उपसरपंचावर अविश्वास ठराव आणण्यात आला. या पंचायतीत असे पहिल्यांदाच घडले. मिळालेल्या माहितीनुसार, फडते या सरपंचपदी असताना दि. २९ नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी पंचायत क्षेत्रातील अनधिकृत कामांबद्दल आक्षेप घेतला होता. कारवाई करण्याचे आश्वासन फडते यांनी ग्रामस्थांना त्या वेळी दिले होते. मागील आठवड्यात त्यासंबंधी कारवाई करण्याचे फडते यांनी जाहीर केले होते. त्यामुळे असंतुष्ट पंचसदस्यांनी त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणला होता. आता भाजपा समर्थक पंचांनी सत्ता काबीज केल्यात जमा आहे. अविश्वास ठरावावेळी भाजपाचे मंडळ अध्यक्ष गुरुप्रसाद पावसकर, सचिव अशोक शेट्टी तसेच इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी निरीक्षक म्हणून संदेश नाईक यांनी कामकाज पाहिले, तर सचिव लेन्सी डायस यांनी त्यांना मदत केली. सध्या पंचायत संचालनालयातर्फे प्रशासक कामकाज हाताळणार असून लवकरच नूतन सरपंच व उपसरपंचाची निवड करण्यात येईल. (प्रतिनिधी)
पेन्ह द फ्रान्समध्ये तीन महिन्यांतच अविश्वास ठराव
By admin | Updated: December 30, 2015 03:09 IST