मडगाव : मागच्या वर्षी संपूर्ण गोव्याला हादरवून सोडणाऱ्या काणकोणच्या रुबी इमारत दुर्घटना प्रकरणातील संशयितांवर आरोपपत्र दाखल करण्याची तयारी चालू आहे. येत्या आठवड्यात आम्ही ९ संशयितांविरुध्द मडगावच्या सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करू, अशी माहिती क्राईम ब्रँचचे पोलीस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी दिली. ४ जानेवारी २0१४ रोजी काणकोणची ही पाच मजली इमारत कोसळून ३२ कामगारांचा मृत्यू झाला होता. या घटनेला दोन दिवसांतच एक वर्ष पूर्ण होणार आहे. या प्रकरणात एकूण ९ संशयित असून इमारतीचे संशयित असलेले दोन बिल्डर परदीपसिंग बेरींग आणि जुगदीप सैगल हे सध्या फरार आहेत. या आरोपपत्राच्या प्रतींचे झेरॉक्स काढण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच आम्ही आरोपपत्र दाखल करू, असे कश्यप यांनी सांगितले. रुबी प्रकरणात संशयित असलेल्या नगरपालिका प्रशासनाच्या तीन अभियंत्यांविरुध्द आरोपपत्र दाखल करण्यासाठी पूर्वपरवानगी देण्यास नगरपालिका प्रशासन संचालनालयाने वेळ काढल्यामुळेच या आरोपपत्राची प्रक्रिया अडून पडली होती. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नगरपालिका प्रशासन संचालक एल्वीस गोमीस यांनी ही मान्यता दिली होती. (प्रतिनिधी)
‘रुबी’ प्रकरणी येत्या आठवड्यात आरोपपत्र
By admin | Updated: January 2, 2015 01:11 IST