१ अब्ज २ कोटी ९४ लाखांची खरेदी : महामंडळाची साडेसात लाख क्विंटलवर मजल गडचिरोली : गेल्या अनेक वर्षाच्या तुलनेत यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने धानपीक भरघोस आले. सर्व गावांची पीक आणेवारी ५० पैशावर आहे. याचा सकारात्मक परिणाम आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदीवर झाला आहे. यंदाच्या खरीप हंगामात तब्बल १ अब्ज २ कोटी ९४ लाख ५२ हजार रूपयांची धान खरेदी आदिवासी विकास महामंडळाने सहकारी संस्थांच्या माध्यमातून केली आहे. ७ लाख ३०७ क्विंटल इतकी धान खरेदी झाली आहे. पहिल्यांदाच महामंडळाची धान खरेदी एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत यंदाच्या खरीप हंगामात एकूण ५५ केंद्रांवरून आतापर्यंत तब्बल ७३ कोटी ३९ लाख ७१९ रूपये किमतीची ४ लाख ९९ हजार २५२ क्विंटल इतकी धान खरेदी झाली आहे. अहेरी कार्यालयांतर्गत ३३ केंद्रांवरून २९ कोटी ५५ लाख ५१ हजार ३३९ रूपये किमतीच्या २ लाख १ हजार ५५ क्विंटल धान खरेदी झाली आहे. कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत आंधळी, कढोली, खरकाडा, कुरखेडा, सोनसरी, गेवर्धा, नान्ही, शिरपूर, गोठणगाव व पलसगड या १० केंद्रांवरून आतापर्यंत १७ कोटी ९३ लाख ८५ हजार ८४९ रूपये किमतीच्या १ लाख २२ हजार ३१ क्विंटल इतक्या धानाची खरेदी झाली. कोरची उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत सहकारी संस्थांच्या मसेली, बेतकाठी, कोरची, बोरी, मर्केकसा, बेडगाव, बोगाटोला, कोटगुल, रामगड, पुराडा, खेडेगाव, मालेवाडा, गॅरापत्ती, चरवीदंड व येंगलखेडा या १५ धान खरेदी केंद्रावर आतापर्यंत १८ कोटी ९० लाख ८१ हजार ९२५ रूपये किमतीच्या १ लाख २८ हजार ६२७ क्विंटल इतक्या धानाची खरेदी झाली आहे. आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत अंगारा, उराडी, देलनवाडी, दवंडी, कुरंडी माल, पिंपळगाव, मौशीखांब, चांदाळा? विहिरगाव व पोटेगाव या १० केंद्रांवर एकूण १४ कोटी १६ लाख ८९ हजार ३७५ रूपये किमतीच्या ९६ हजार ३८७ क्विंटल इतकी धान खरेदी झाली आहे. धानोरा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत रांगी, सोडे, चातगाव, मुरूमगाव, धानोरा, दुधमाळा, कारवाफा, गट्टा, पेंढरी, मोहली, येरकड, सावरगाव व सुरसुंडी या १३ धान खरेदी केंद्रावर एकूण ११ कोटी ३५ लाख ८० हजार ५९३ रूपयांची धान खरेदी करण्यात आली. या केंद्रांवर ७७ हजार २६५ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. घोट प्रादेशिक कार्यालयांतर्गत मक्केपल्ली, रेगडी, घोट, आमगाव, मार्र्कंडा कं, अड्याळ, सोनापूर, गुंडापल्ली, भाडभिडी बि. व गिलगाव या १० केंद्रांवर एकूण ७४ हजार ९४० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. या खरेदी केलेल्या धानाची एकूण किमत ११ कोटी १ लाख ६२ हजार ९७६ रूपये आहे. आदिवासी विकास महामंडळाने सहकारी संस्थांच्या माध्यमातून यंदा मोठ्या प्रमाणात धान खरेदी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी) २० केंद्रावर गोदामाची व्यवस्था नाही शेतकऱ्यांची धान विक्रीसाठी अडचण होऊ नये, याकरिता महामंडळातर्फे सहकारी संस्थांचे धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले. मात्र अनेक केंद्रांवर धान साठवणुकीसाठी गोदामाची व्यवस्था नाही. त्यामुळे संबंधित संस्थांनी ओट्यावर व उघड्यावर यंदा धान खरेदी केली. गोदामाची व्यवस्था नसलेल्या २० केंद्रांमध्ये खरकाडा, गेवर्धा, नान्ही, शिरपूर, गोठणगाव, पलसगड, बोरी, बोगाटोला, कोटगूल, पुराडा, खेडेगाव, चरवीदंड, मौशीखांब, सोडे, येरकड, सावरगाव, सोनापूर, गुंडापल्ली, भाडभिडी बि. व गिलगाव आदींचा समावेश आहे. २ हजार ८७१ शेतकरी चुकाऱ्याच्या प्रतीक्षेत आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी प्रक्रियेत संबंधित केंद्रांवरून शेतकऱ्यांच्या हातात थेट रोख रक्कम दिली जात नाही. धानाची विक्री झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर धान विक्रीचे पैसे अदा केले जातात. मात्र राज्य शासनातर्फे हुंड्या वटविण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना दोन-दोन महिने चुकाऱ्याच्या रक्कमेसाठी प्रतिक्षा करावी लागते. अद्यापही २ हजार ८७१ शेतकऱ्यांचे एकूण ११ कोटी १९ लाख ८३ हजार रूपयांची धान चुकाऱ्याची रक्कम प्रलंबित आहे. शेतकरी अडचणीत असल्यामुळे वारंवार बँकेत जाऊन पैसे जमा झाले की, काय याबाबत विचारणा करीत आहेत.
यंदा रेकॉर्डब्रेक धान खरेदी
By admin | Updated: April 2, 2017 01:39 IST