गुंडापल्ली : चामोर्शी पंचायत समितींतर्गत येणाऱ्या राममोहनपूर गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याच्या कारणावरून गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले होते. या शाळेला आज शिक्षणाधिकारी उल्हास नरड, शिक्षण विस्तार अधिकारी व्ही. डब्ल्यू डबरे, विस्तार अधिकारी मेश्राम, सर्व शिक्षा अभियानाचे ऐलावार आदींनी भेट देऊन गावकऱ्यांची भूमिका समजावून घेतली.मागील १२ दिवसांपासून ही शाळा शिक्षक नसल्याच्या कारणावरून बंद होती. शाळेला गावकऱ्यांनी कुलूप ठोकल्यामुळे पटांगणात शाळा भरविण्यात आली. आज शिक्षणाधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी राममोहनपूरला पोहोचताच विद्यार्थी व गावकऱ्यांनी शिक्षक द्या, शिक्षक द्या अशी मागणी केली. शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला शिक्षक मिळाल्याशिवाय आम्ही शाळा सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका यावेळी घेतली. शिक्षणाधिकारी यांनी राममोहनपूरच्या ग्रामस्थ व पालकांना ३० डिसेंबरपर्यंत शिक्षकाची नियुक्ती केली जाईल, असे आश्वासन लेखी स्वरूपात दिले. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शाळेचे कुलूप ग्रामस्थांनी उघडले व आता शाळा मंगळवारपासून सुरळीत सुरू होईल, अशी माहिती ग्रामस्थांनी लोकमतशी बोलताना दिली. (वार्ताहर)
राममोहनपूर शाळेला मिळाला शिक्षक
By admin | Updated: December 29, 2014 23:42 IST