देसाईगंज येथे जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असल्याने लगतच्या चारही जिल्ह्यांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण आहे. कपडा, किराणा, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल्स व इतरही साहित्याची मोठी व्यापारपेठ म्हणून शहर प्रसिद्ध आहे. लगतच्या कोरची, कुरखेडा, आरमोरी लाखांदूर, अर्जुनी/मोरगाव या तालुक्यासह गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचा मोठा ओघ असताे. तालुका मुख्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विसोरा नजीकच्या राज्य राखीव पोलीस दलात वर्तमान स्थितीत ४०० ते ५०० कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसह किमान २ ते ३ हजार कर्मचारी-अधिकारी वास्तव्यास आहेत. भविष्यात ८०० ते ९०० निवासस्थाने प्रस्तावित असून, किमान तेवढेच पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मिळून किमान ४ ते ५ हजार पोलीस कर्मचारी वास्तव्यास राहण्याची शक्यता आहे.
गरजेनुसार जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणात मागणी होणार असून, परिसरातील शेतकऱ्यांना जोडधंदा करून आर्थिक उन्नती साधण्यास बराच वाव आहे. भाैतिक वस्तुंच्या सुविधेसह कृषी उत्पादनांची माेठ्या प्रमाणात मागणी राहणार आहे. स्थानिकांना विविध उद्योग उभारून आत्मनिर्भर होण्यास बरीच मदत होणार आहे.