गडचिराेली : जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी कामावर रुजू हाेण्याचा दिलेला आदेश घेऊन १८ जून राेजी सुमारे २२८ हंगामी क्षेत्र कर्मचारी कामाच्या ठिकाणी गेले असता, जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांचे ताेंडी निर्देश असल्याचे सांगून प्राथमिक आराेग्य केंद्रस्तरावरील डाॅक्टरांनी हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आल्यापावली परत जावे लागले.
गडचिराेली जिल्ह्यात हिवताप रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात आहे. हिवताप आटाेक्यात आणण्यासाठी २०१५-१६ मध्ये सुमारे ८३९ कर्मचाऱ्यांची हंगामी तत्त्वावर नेमणूक करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना त्यावर्षी जवळपास दाेन ते तीन महिन्यांचे काम मिळाले हाेते. त्यानंतर मात्र काम मिळणे बंद झाले हाेते. काही जुन्या फवारणी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर काम चालविले जात हाेते. मे महिन्यात या जुन्या कर्मचाऱ्यांना फवारणी करण्याचे निर्देश जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आले. मात्र, वाढीव मजुरीची मागणी करून ते रुजू झाले नाहीत. त्यामुळे जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी २०१५-१६ नियुक्त केलेल्या हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांपैकी २२८ कर्मचाऱ्यांना १८ जून राेजी रुजू हाेण्याचे निर्देश दिले. नवीन कर्मचारी रुजू झाल्यास आपला राेजगार हिरावला जाईल, या भीतीने आंदाेलन करणाऱ्या जुन्या कर्मचाऱ्यांनी मिळेल त्या मजुरीवरच काम करण्यास सहमती दर्शविली. त्यामुळे नवीन कर्मचाऱ्यांना नेमणूक देण्यात आली नाही. नवीन कर्मचारी रुजू हाेण्यास गेले असता, संबंधित तालुका आराेग्य अधिकारी, हिवताप निरीक्षकांनी जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांचे निर्देश असल्याने आपण रुजू करून घेऊ शकत नाही, असे सांगून रुजू करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा हिरमाेड हाेऊन त्यांना परत जावे लागले, तसेच बरेच कर्मचारी शिधा व इतर साहित्य धरून गेले हाेते. त्यांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. याबद्दल हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आपल्याला रुजू करून न घेतल्यास तीव्र आंदाेलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
बाॅक्स....
दुसऱ्या जिल्ह्यातील मजुरांना नियुक्ती
जुने कर्मचारी असल्याने त्यांना काम करताना प्राधान्य दिले जाते. मात्र, यातील बहुतांश कर्मचारी दुसऱ्या जिल्ह्यांतील आहेत. गडचिराेली जिल्ह्यात अगाेदरच बेराेजगारी असताना दुसऱ्या जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांची का नियुक्ती केली जाते, असा प्रश्न नवीन कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. जुन्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कमी झाली आहे. त्यामुळे ते व्यवस्थित काम करीत नाहीत. तीन दिवसांत रुजू हाेण्याचे निर्देश नियुक्ती आदेशात दिलेले राहतात. मात्र, हे कर्मचारी धानाचे राेवणे झाल्यावर रुजू हाेऊन फवारणीची कामे करतात. ताेपर्यंत मलेरियाचा प्रसार झालेला राहतो, असाही आराेप नवीन कर्मचाऱ्यांनी केला आहे.
काेट....
जुने कर्मचारी रुजू हाेण्यास तयार नव्हते. त्यामुळे नवीन कर्मचाऱ्यांना रुजू आदेश देण्यात आले. त्यानंतर मात्र जुन्या कर्मचाऱ्यांनी काम करण्यास सहमती दर्शविली. जिल्हा परिषद अध्यक्षांनी जुन्या कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्याचे निर्देश दिले, तसेच जुन्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या वेळी प्राधान्य द्यावे लागते. त्यामुळे वेळेवर नवीन कर्मचाऱ्यांचा नियुक्ती आदेश रद्द करावा लागला.
-डाॅ. कुणाल माेडक, जिल्हा हिवताप अधिकारी, गडचिराेली