वैरागड : परिसरातील बहुतांश मार्ग मध्यभागी खोलगट पडले असून या खोलगट भागात पावसाचे पाणी साचून राहत असल्याने पावसाळ्यामध्ये या मार्गावरील डांबर पूर्णपणे उखडून जाते. त्यामुळे या मार्गांवर नेहमीच खड्डे पडले असल्याचे दिसून येते. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. वैरागड परिसरातील सावलखेडा-कराडी, वैरागड-कढोली मार्ग मध्यंतरी दबला आहे व दोन्ही बाजुसह उंचवटे निर्माण झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचून राहते. या मार्गावरून नेहमी जड वाहनांची ये-जा सुरू राहते. बरेच दिवस पाणी सासून राहिल्यामुळे डांबर पूर्णपणे उखडते. डांबर उखडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने किरकोळ दुरूस्ती करून मुलामा लावला जातो. कढोली-वैरागड मार्गाच्या दुरूस्तीसाठी स्वतंत्र मजूर नेमले जातात. मात्र सदर मजुरसुध्दा काम करीत नाही. कागदोपत्री काम दाखवून पैसा हडप केल्या जाते. या मार्गांवर नेहमी होणारा खर्च टाळण्यासाठी सदर मार्गाचे पूर्णपणे खोदकाम करून मार्गावर बोल्डर व लहान गिट्टी टाकून सदर मार्ग आणखी व्यवस्थित बनविणे आवश्यक आहे. अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाला दरवर्षीच या मार्गावर खर्च करावा लागणार असून जनतेला खड्ड्यांचा सामना करावा लागणार आहे. (वार्ताहर)
खोलगट भागामुळे रस्त्यांची दुरवस्था
By admin | Updated: December 29, 2014 01:19 IST