मुलचेरा : ७ मे २०२१ राेजी राज्य शासनाने काढलेला शासन निर्णय रद्द करून पदाेन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण कायम ठेवावे, अशा मागणीचा ठराव मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली (माल) ग्रामपंचायतीने घेतला आहे. अशाप्रकारचा ठराव घेणारी ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत असावी.
सरपंच रेखा कन्नाके यांच्या अध्यक्षतेखाली १८ जून राेजी ग्रामपंचायतीची सभा घेण्यात आली. या सभेदरम्यान ग्रा.पं. सदस्य विद्याधर सागडे यांनी ठराव मांडला. त्याला उपसरपंच महेंद्र आत्राम यांनी अनुमाेदन दिले, तसेच सदस्य संदीप चाैधरी, विजू मांदाळे, दीपक मडावी, उषा सिडाम, भगिरथा कुकुडकर, सरिता येलमुले यांनी बिनविराेध ठराव पास केला. यावेळी ग्रामविकास अधिकारी देवानंद फुलझेले उपस्थित हाेते.
पदाेन्नतीमधील आरक्षण हा मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. हा हक्क मिळवून देण्यासाठी राज्यभरातील ग्रामपंचायतींनी अशा प्रकारचा ठराव घ्यावा, जेणेकरून शासनाला मागासवर्गीयांची ताकद व त्यांच्या व्यथा कळण्यास मदत हाेईल, असे मार्गदर्शन सरपंच रेखा कन्नाके यांनी सभेदरम्यान उपस्थित सदस्यांना केले.