दिगांबर जवादे ल्ल गडचिरोलीशहरातील मुख्य रस्त्यांच्या बाजूला अतिक्रमण करून शेकडो दुकाने थाटण्यात आली आहेत. अतिक्रमणात असल्यामुळे या दुकानदारांना किराया द्यावा लागत नसल्याची सर्व सामान्य व्यक्तीची समजूत असली तरी प्रत्यक्षात मात्र या दुकानदारांना महिन्याचे हजार ते दीड हजार रूपये किराया ज्या व्यक्तींनी यापूर्वी जागा पकडली आहे, त्या व्यक्तीला किराया द्यावा लागत आहे. जागा पकडणारे नागरिक यातून महिन्याकाठी ७ ते ८ हजार रूपये महिन्याचे कमावित आहेत. जिल्हा निर्मितीनंतर गडचिरोली शहरात विविध कार्यालये स्थापन झाली. त्याचबरोबर जिल्हास्थळ असल्याने प्रशासकीय कामांसाठी या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढली आहे. बरेचशे कर्मचारी गडचिरोली येथेचे राहून ये- जा करतात. त्यामुळे शहराची लोकसंख्या मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढली आहे. त्याचबरोबर व्यवसायही तेजीत आला आहे. गडचिरोली शहरातील काही नागरिकांनी इंदिरा गांधी चौकातील रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण करून दुकान थाटले होते. काही जणांचे दुकान अजुनही सुरू आहे. तर काहींना मात्र दुकान बंद करावे लागले. दुकान जरी बंद झाले असले तरी या नागरिकांनी जागेवरील ताबा मात्र सोडला नाही. या जागेवर दुसऱ्याला दुकान थाटायचे असेल तर जागा पकडणाऱ्यासोबत सर्वप्रथम बोली करावी लागते. त्यामध्ये मासिक किराया ठरविल्या जातो. किराया ठरवितांना जागेचा आकार व मुख्य चौकापासून जागेचे अंतर लक्षात घेतले जाते. जेवढी जागा जास्त व चौकापासूनचे अंतर कमी तेवढाच त्याचा किराया जास्त आकारला जातो. या जागेचे प्लॉटप्रमाणे तुकडे पाडून किराया आकारल्या जात आहे. काही दुकानदार तर जागा मालकाला पगडीही देत आहेत. हे सर्व अवैध असल्याने याबाबतची फारशी चर्चा उघडपणे केली जात नाही. त्यामुळे अतिक्रमण करून दुकान थाटलेल्यांना कोणताही खर्च नाही. अशी सर्वसामान्य नागरिकांची समजूत असली तरी प्रयत्यक्षात मात्र हजार ते दीड हजार रूपये भाडे द्यावे लागत आहे. याठिकाणचे दुकानही चांगले चालून दिवसाकाठी ५ ते ६ हजारांचा गल्ला होत असल्याने तेवढे भाडे देण्यासाठी दुकानदारसुद्धा सहज तयार होत आहेत. ऐवढेच नाही तर सकाळी व सायंकाळी काही वेळ चौकात हातगाडीवर नाश्ता व चहा विकणाऱ्यांकडूनही महिन्याकाठी भाडे वसूल केले जाते. अन्यथा त्या ठिकाणी हातगाडी लावण्यास मनाई केली जात आहे.
इंदिरा गांधी चौकात अतिक्रमणाचाही किराया
By admin | Updated: September 13, 2014 23:53 IST