पुराचा बसतो फटका : जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले निवेदनअहेरी : तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या येंकापल्ली गावाला दरवर्षीच पुराच्या पाण्याचा फटका बसतो. त्यामुळे या गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी अहेरी तहसीलदारांच्या मार्फतीने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून नागरिकांनी केली आहे. येंकापल्ली येथील नागरिकांनी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष वामन राऊत यांच्या नेतृत्वात निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, येंकापल्ली गावाला पुराचा फटका बसत असल्याने १९८८ साली शासनाने या गावाच्या पुनर्वसनाकरिता मंजुरी प्रदान केली. त्याचबरोबर तलाठी साजा क्र. ५ अंतर्गत येणाऱ्या सर्वे नं. २/१७, २/१८, २/१९ व २/२० ची जागा आरक्षितही केली आहे. मात्र त्यानंतर प्रशासनाने पुनर्वसन करण्यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे २५ वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही पुनर्वसन रखडले आहे. पुनर्वसनासंदर्भात २९ आॅक्टोबर २०१५ रोजी नागेपल्ली ग्रामसभेत ठरावसुद्धा पारित करण्यात आला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी वामन राऊत यांच्यासह शंकर बोरकुटे, शंकर दुर्गे, भीमराव पागडे यांच्यासह गावकरी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
येंकापल्ली गावाचे पुनर्वसन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2016 01:25 IST