गडचिराेली : स्काॅय असाेसिएशन ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य स्पाेर्ट कौन्सिल तसेच क्रीडा व खेल मंत्रालय भारत सरकारच्या वतीने १२ ते १३ जूनदरम्यान दुसरी ऑनलाइन राज्यस्तरीय स्काॅय मार्शल आर्ट आर्टस्टिक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत गडचिराेेली येथील प्लॅटिनम ज्युबिली स्कूलच्या चार विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन या चाैघांनी सुवर्ण व राैप्यपदक प्राप्त करून शाळेचा नावलाैकिक केला. या चारही विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रपतीपदक प्राप्त एंजल देवकुले हिने सुवर्णपदक, ओम बाेंदरे याने सुवर्णपदक, आर्यन झांबरे याने सुवर्णपदक तर सिद्धी गभणे हिने राैप्यपदक प्राप्त केले आहे. या चारही विद्यार्थ्यांची दुसऱ्या ऑनलाइन राष्ट्रीय स्काॅय मार्शल आर्ट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शाळेच्या वतीने खेळाडूंना आवश्यक साेयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्लॅटिनम ज्युबिली स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी हाेण्यासाठी प्राेत्साहन दिले जाते. यापुढेही विद्यार्थ्यांना शाळेकडून अशाप्रकारचे प्राेत्साहन व आवश्यक त्या साेयीसुविधा पुरविण्यात येतील, असे प्रतिपादन संस्थेचे महासचिव अजीज नाथानी यांनी केले.
शालेय शिक्षणाबराेबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ही शाळा नेहमीच कटिबद्ध आहे. शालेय शिक्षणासाेबतच क्रीडा, साहित्य, कला व सामाजिक कार्यात सहभागी हाेण्यासाठी विद्यार्थ्यांना नेहमी प्रेरित केले जाते, असे शाळेचे मुख्याध्यापक रहिम अमलानी यांनी यावेळी सांगितले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे महासचिव अजीज नाथानी, सहसचिव करीम लाखानी, संचालक अमीरअली नाथानी, शाैकत धमानी, समीर हिराणी, निझार देवाणी व शाळेचे मुख्याध्यापक रहिम अमलानी यांनी काैतुक केले आहे.
बाॅक्स....
विविध राेपट्यांची लागवड
राज्यपाल भगतसिंग काेश्यारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १७ जून राेजी अनेक ठिकाणी वृक्षाराेपण करण्यात आले. दरम्यान, सुवर्णकन्या एंजल देवकुले हिच्या पुढाकाराने शाळेच्या परिसरात वृक्षाराेपण करण्यात आले. यावेळी विविध राेपट्यांची लागवड करण्यात आली.