गडचिरोली : वनरक्षक पदाच्या भरतीसाठी आलेली भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथील संगीता मडावी (२२) या युवतीच्या हत्या प्रकरणात वनरक्षक असलेला आरोपी मनोज सडमेक याच्यासह आणखी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मनोजचा अटकपूर्व जामीन गडचिरोली सत्र न्यायालयाने फेटाळला असून त्याला २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी तर अन्य चार आरोपींना २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.७ नोव्हेंबर २०१४ रोजी गडचिरोली येथे वनरक्षक पदाच्या भरतीसाठी आलेली संगीता मडावी अचानक गायब झाली. १७ नोव्हेंबरला भामरागड पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा तिच्याशी लग्न ठरलेल्या संतोष सडमेक या वनरक्षकाकडे वळविली. मनोजने संगीताला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तत्पूर्वी आरोपीने सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीनाकरिता अर्ज दाखल केला होता. मात्र प्रत्यक्ष साक्षीदार तपासून सत्र न्यायालय गडचिरोली यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला व त्यानंतर पोलिसांनी मनोज सडमेकला अटक केली व मनोज सडमेक याने संगीता हिच्यासोबत काम करणारी महिला वनरक्षक माधुरी वट्टी हिचे सोबत असलेल्या प्रेम संबंधातून तिच्याशी लग्न करता यावे, म्हणून संगीताला कारसपल्ली जंगलात नेऊन आपल्या सहकार्यासह तिची गळा दाबून हत्या केली व तिचा मृतदेह वनविभागाच्या बिटावर जाळून टाकला, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या हत्याकांडात मनोजचे मित्र असलेले मनोज मडावी, मारोती वेलादी, एकनाथ इष्टाम, प्रमोद वेलादी रा. सर्व कारसपल्ली ता. अहेरी यांचाही सहभाग असल्याने त्यांच्या विरूद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिली आहे. (प्रतिनिधी)
आरोपींची संख्या चारने वाढली
By admin | Updated: December 27, 2014 01:40 IST