११.९४ कोटींचा निधी प्राप्त
दिगांबर जवादे - गडचिरोली
जीवन जगण्याची लढाई लढताना व्यक्ती अनेक अडचणींचा सामना करतो. मृत्यूनंतर इहलोकाची यात्रा सुकर व्हावी, अशी अनेकांची इच्छा असते. प्रत्येक गावात ही इहलोकाची यात्रा अंतिम क्षणी विलीन होण्यासाठी मोक्षधाम, कब्रस्थान निर्माण करण्यात आले आहेत. मात्र या स्थळांच्या विकासाकडे पूर्वी सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. परंतु आता राज्य शासनाने मोक्षधाम, कब्रस्थान यामध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतींना विशेष अनुदान देण्याची योजना तयार केली आहे. या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील मोक्षधाम व कब्रस्थान चकाचक होणार आहेत. मृत्यू ही जगातील अटळ बाब आहे. हिंदू धर्मानुसार मृत्यू झालेल्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होऊन त्याच्या आत्म्याला शांती मिळते. त्यामुळेच मृत्यूनंतर शेवटचा संस्कार म्हणून अंतिम संस्कार करण्याची प्रथा हिंदू धर्मामध्ये आहे. त्यासाठी प्रत्येक गावात दफनविधीसाठी जागा राखीव ठेवण्यात आली होती. कालांतराने या जमिनीवर काही नागरिकांनी अतिक्रमण केले. त्याचबरोबर या जागेकडे शासनाचे दुर्लक्ष झाले होते. बर्याच गावातील दफनभूमी नदीच्या काठावर किंवा गावापासून दोन ते तीन किमी अंतरावर आहेत. दफनभूमीकडे जाणार्या मार्गाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले होते. काही ठिकाणीतर मार्गच अस्तित्वात नसल्याने शेतांमधून अंतिमयात्रा काढावी लागत होती. पावसाळ्यामध्ये ही समस्या आणखीनच बिकट होत होती. त्यामुळे मोक्षधाम परिसराचा विकास करण्याची मागणी होत होती. राज्य शासनाने मोक्षधाम परिसराच्या विकासासाठी ग्रामपंचायतीला विशेष अनुदान देण्याचे धोरण अवलंबिले आहे. या योजनेची सुरूवात सप्टेंबर २०१० मध्ये झाली असली तरी गडचिरोली जिल्ह्यात २०१२-१३ या आर्थिक वर्षामध्ये २ कोटी ८३ लाख रूपये निधी प्राप्त झाला आहे. या निधीमधून ५७ मोक्षधाम परिसराचा विकास करण्यात आला. २०१३-१४ मध्ये ९ कोटी ११ लाख रूपये प्राप्त झाले असून या अंतर्गत १३१ कामे सुरू आहेत. या निधीमधून ज्या गावामध्ये दफनभूमीसाठी ग्रामपंचायतीची किंवा शासकीय जागा नसेल त्या ग्रामपंचायतीला जागा खरेदी करता येईल. दफनभूमीवर मृतदेह दहनाकरिता चबुतर्याचे बांधकाम करता येणार आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये मृतदेह दहनासाठी पावसामुळे अडचण येऊ नये यासाठी चबुतर्याच्या वर शेडचे बांधकाम करण्यात यावे. त्याचबरोबर अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी सोय म्हणून एक अतिरिक्त शेड बांधता येणार आहे. इंधन खर्च कमी करण्यासाठी ग्रामपंचायतीची लोकसंख्येचा विचार करून विद्युत शवदाहिनी लावता येणार आहे. दफनभूमीपर्यंत जाणार्या रस्त्याची दुरूस्ती करणे, आवश्यकतेनुसार दफनभूमी संरक्षण भिंत बांधणे, ज्या ग्रामपंचायतीमधील दफनभूमीमध्ये विद्युतची सुविधा नाही, अशा ठिकाणी विद्युत पुरवठा करता येणार आहे. त्याचबरोबर मार्गावर पथदिवे देखील लावता येणार आहे. अंत्यविधीसाठी येणार्या नागरिकांना पाण्याची सोय उलपब्ध करून देण्यासाठी स्मशानभूमी परिसरात हातपंप खोदणे किंवा नळाद्वारे पाण्याचा पुरवठा करणे, गरजेनुसार बगीचा निर्मितीसाठी या निधीचा खर्च करता येणार आहे. यासाठी जास्तीतजास्त १० लाख रूपयापर्यंतचा निधी प्रत्येक ग्रामपंचायतीला खर्च करता येणार आहे. यामुळे दफनभूमीचा विकास होऊन त्या चकाचक होण्यास मदत होणार आहे. आरमोरी येथील गाढवी नदी काठावरील मोक्षधाम रस्ता व शेडजवळील परिसराचे काँंक्रीटीकरण करण्यात आले आहे.