गडचिरोली : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये झुडुपी जंगल आहे. सदर जंगल शेतकऱ्यांना शेतजमिनीसाठी उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. वाढत्या लोकसंख्येबरोबरच जमिनीचे तुकडेही वाढत चालले आहेत. कमी जमिनीत यांत्रिकीकरण करणे शक्य होत नाही.
पोर्ला बसस्थानकावर गतिरोधकाची गरज
गडचिरोली : तालुक्यातील तसेच गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथे नेहमीच बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहने हाकत असतात. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावे, अशी मागणी आहे.
जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई
आलापल्ली : शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही. खमनचेरू प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर याबाबत प्रचंड दिरंगाई होत असल्याचे दिसून येते.
घाण पाण्याच्या गटाराने डास वाढले
गडचिरोली : स्थानिक नगरपालिका क्षेत्रात विविध वॉर्डांत मोकळ्या भूखंडावरून घाण पाण्याची डबकी तसेच गटारे निर्माण झाली आहेत. या गटारांच्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे. परिणामी शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जंतुनाशक फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती केव्हा होणार?
गडचिरोली : सिंचाई विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात नाल्यांवर शेकडो कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र मागील अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. अनेक बंधारे फुटले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी साचून राहत नसल्याने सभोवतालचे शेतकरी अडचणीत आले आहेत. नदी, नाले, तलाव, बोड्या असूनही बंधारे योग्य नसल्याने व्यवस्था अपुरी आहे.
ग्रामीण भागात वीज चोरीच्या प्रमाणात वाढ
गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र वीजचोरीचा भुर्दंड इतर नागरिकांना सहन करावा लागत आहे. दुर्गम व ग्रामीण भागात कार्यक्रमांदरम्यान विजेच्या तारांवर आकडे टाकून वीजचोरी केली जात आहे.
पेंढरी येथे गॅस एजन्सीची गरज
धानोरा : वन विभागामार्फत संयुक्त वन व्यवस्थापनचे सदस्य व जंगल परिसरातील नागरिकांना अनुदानावर मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. पेंढरी परिसरातील ९० टक्के कुटुंबांकडे गॅस आहेत. मात्र गॅस एजन्सी केवळ धानोरा येथेच आहे. पेंढरी हे परिसरातील मोठे गाव आहे. या गावात गॅस एजन्सी द्यावी.
कोरची शहरात फवारणीकडे दुर्लक्ष
कोरची : शहरातील विविध वॉर्डांत अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजारी लोकांची संख्या वाढत चालली आहे. घाण पाण्याच्या गटारामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे.
मोकाट जनावरांमुळे रहदारी बाधित
आष्टी : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभी राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत असून वाहनधारकांना नेहमी अपघाताची भीती असते. अनेक मार्गांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. वारंवार प्रशासनाला सांगूनही माेकाट जनावरांचा बंदाेबस्त करण्यात आला नाही.
कुपोषित भागामध्ये परसबाग योजना राबवा
गडचिरोली : आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अत्याधिक असल्याने शासनाने त्यावर भाजीपाला व फळरोपांचा उपाय शोधला. आदिवासी कुटुंबांना परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहन देणारी योजना राबविली जात होती. आता मात्र या योजनेकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. सदर योजना पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे.
बांधकाम साहित्यामुळे रहदारीस अडथळा
गडचिरोली : शहरात विविध भागात घराचे बांधकाम सुरू असून बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवत आहेत. लोखंडी सळाख तोडण्याचे कामही रस्त्यावरच करण्यात येते. शिवाय रस्त्यावरच विटा, रेती, गिट्टी, सळाख आदी साहित्यही ठेवले आहे. मात्र याकडे न.प.चे दुर्लक्ष आहे.
दुर्गम भागात कर्मचारी राहतच नाहीत
धानोरा : धानोरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील तसेच आरमोरी, देसाईगंज, आरमोरी, कोरची व कुरखेडा तालुक्याच्या दुर्गम भागात कार्यरत व दररोज अप-डाऊन करत आहेत. हे कर्मचारी दुर्गम भागात राहतच नसल्यामुळे ते कार्यालयात नियमित हजर राहात नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील कार्यालये ओस पडत आहेत.
चपराळा येथे सोयीसुविधा पुरवा
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र प्रशांतधाम चपराळा येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. मात्र याठिकाणी सोयीसुविधांचा अभाव असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या स्थळाचा विकास करावा, अशी मागणी भाविकांनी केली आहे. चपराळा येथे भेट देणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या वाढली आहे.
हूक टाकून विजेची चोरी सुरूच
वैरागड : महावितरणचे बहुतांश कर्मचारी घरूनच कारभार हाकत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचा फटका महावितरणला बसत आहे. त्यामुळे महावितरणने लक्ष देण्याची मागणी सुज्ञ ग्राहकांकडून होत आहे. मुलचेरा तालुक्याच्या ग्रामीण भागात वीज चोरीचे प्रमाण अधिक आहे.
उपाहारगृहांमधील पदार्थ उघड्यावर विक्रीला
गडचिरोली : शहरासह अनेक तालुका मुख्यालयाच्या उपाहारगृह व हॉटेलमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री होत आहे. यामुळे परिसरात विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. मात्र याकडे अन्न व पुरवठा विभागातर्फे कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
लिलावाअभावी वाहने गंजण्याची शक्यता
गडचिरोली : अपघात झाल्याने काही प्रमाणात मोडलेले वाहने अपघातानंतरच्या न्यायालयीन प्रकरणामुळे किंवा कागदपत्रांअभावी अनेक पोलीस ठाण्यामध्येच ठेवली आहेत. ही वाहने बाहेरच असल्याने ती भंगार झाली आहेत. त्यामुळे वाहनांचा लिलाव करावा, अशी मागणी होत आहे.
पशुधन सांभाळताना पशुपालक त्रस्त
अहेरी : अहेरी उपविभागासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र बऱ्याचशा पशुपालकांकडे हाडकुळ्या गायी व बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना शेतकऱ्यांना त्रास होत आहे. अनेक शेतकरी असे पशुधन विकण्याच्या तयारीत आहे. पशुधन घटल्याने दुग्ध व्यवसायावरही परिणाम झाला आहे.
हेमाडपंती शिवमंदिर जीर्णावस्थेत
गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिवमंदिर आहे. सदर मंदिर हेमाडपंती आहे. अमिर्झापासून चार किमी अंतरावर असलेल्या या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सदर मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. सदर मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते. या मंदिरातून भुयार जात असून ते भुयार वैरागड येथील किल्ल्यामध्ये निघते, असे सांगितले जाते.