वैरागड : पावसाचा जोर कमी होणारा पुष्य नक्षत्र सुरू होऊनदेखील नदी, तलाव, बोड्यातील जलसाठा कमीच असून, या वर्षात हवामानात कमालीचा बदल दिसून येत असून, भर पावसाळ्यातही प्रचंड तापमान असल्याने थोडाफार पाऊस झाला तरी शेत शिवारातील साठलेले पाणी अल्प वेळात आटत जात असून, पुन्हा आठ-दहा दिवस पावसाची अशीच स्थिती राहिल्यास हलके धान पीक मुदतबाह्य ठरण्याची शक्यता आहे.
यंदा वैरागड आणि परिसरात सिंचन सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या प्रारंभीच म्हणजे ८ ते १० जूनपासून धान रोवणीला सुरुवात केली होती. सिंचन सुविधा असणाऱ्या शेतकऱ्याचे ६० टक्के धान रोवणी आटोपली पण ज्या शेतकऱ्याकडे सिंचन सुविधा नाही, अशा शेतकऱ्यांच्या धान रोवणीचे काम खोळंबले आहे. पावसाची चार-पाच दिवस कायमची उसंत नसली तरी सायंकाळच्या सुमारास वैरागड आणि परिसरात पाऊस येतो पण, दिवसभराचे कडक ऊन आणि प्रचंड तापमानामुळे पाणी आटून जातो त्यामुळे अजूनही बरीच रोवणी थांबलेली आहेत.
मागील चार-पाच वर्षांतील पावसाळ्यातील तापमानापेक्षा सन २०२१ वर्षातील तापमानात मोठा बदल दिसून येत आहे. प्रचंड तापमानामुळे शेती कामदेखील प्रभावित झाली आहेत. दरवर्षी अनुभव पाहता पावसाळ्यात वातावरणात असणारा गारवा नाही किंवा पावसाची रिमझिम नाही. त्यामुळे श्रमिकाला शेती कामात उत्साह दिसत नाही या कडक उन्हात थोडे फार श्रम केले की शेतमजूर विश्रांतीसाठी सावलीचा आश्रय घेत आहेत.
बॉक्स
मानवी कृतीतून निर्माण होणारा कार्बन डाय-ऑक्साइड मोठ्या प्रमाणात वनस्पती शोषून घेतात, पण दिवसेंदिवस मानवाकडून होणारी बेसुमार झाडांची कत्तल त्यामुळे भर पावसातही प्रचंड तापमान वाढत आहे ही मानवीकृत संकट असून, आता वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी वनविभागासह प्रत्येकाची जबाबदारी आहे.
धर्मवीर सालविठ्ठल, उपवनसंरक्षक
वडसा वनविभाग वडसा