तीन दिवसांपूर्वी पेपरमिल येथील मंदिराजवळ इल्लूर येथील सरपंच तुळशीराम मडावी यांच्या मालकीच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. तसेच इल्लूर येथील बामनकर यांच्या गोठ्यातील शेळ्या फस्त केल्या. त्यामुळे इल्लूर गावातील नागरिक बिबट्याच्या दहशतीत आहेत. पेपरमिल वसाहतीच्या मागे घनदाट जंगल आहे. या जंगलात जंगली डुकरं मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बिबट्याने आपले बस्तान येथे मांडलेले आहे. शिवाय पेपरमिल वसाहतीला लागून इल्लूर गाव असल्याने मागच्या बाजूने हा बिबट्या रात्री गावात जाऊन शेळ्यांची शिकार करीत आहे. त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत असून, वनविभागाने आर्थिक मोबदला देण्याची मागणी करण्यात येत आहे. या बिबट्याने तीन पिलांना जन्म दिला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सध्या तरी हा बिबट्या आपल्या पिलांना सोडून कुठे जाणार नाही. पिलांसाठी तो शेळ्यांची शिकार करण्यासाठी गावात परत येत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावातील नागरिक सायंकाळी बाहेर न निघता घरीच राहणे पसंत करतात. या बिबट्याचा बंदोबस्त तत्काळ करण्यात यावा, अशी मागणी पं. स. सदस्य शंकर आकरेड्डीवार यांनी केली आहे.
इल्लूर व पेपरमिल वसाहतीत बिबट्याची दहशत वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:26 IST