सिरोंचा : गडचिरोली वनवृत्तातील सिरोंचा वनविभागांतर्गत कमलापूर वनपरिक्षेत्रात गेल्या १०-१२ वर्षांपासून वनविभागाचे हत्ती सांभाळण्याचे काम करीत असलेले माहूत व चाराकटर हे अद्यापही सेवेत अस्थायीच आहे. आपला जीव धोक्यात घालून सदर अस्थायी कर्मचारी गेल्या १०-१२ वर्षांपासून काम करीत आहेत.सिरोंचा वनविभागांतर्गत कमलापूर वनपरिक्षेत्राच्या हद्दीत वनविभागाच्यावतीने लाकडांचे ओंडके ने-आण करण्यासाठी हत्तीचा गेल्या अनेक वर्षांपासून उपयोग केल्या जात आहे. येथील हत्तींची देखभाल करण्यासाठी वनविभागाच्यावतीने चार अस्थायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचे आदेश देऊन रोजनदारीवर हत्ती देखभालीचे काम करवून घेतल्या जाते. मात्र वनविभागाने गेल्या १०-१२ वर्षांपासून या कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवेत कायम सामावून न घेता माहूत व चाराकटर पदासाठी सरळ सेवेची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे या कार्यरत कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. या संदर्भात अस्थायी महावत व चाराकटर मजुरांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन कार्यरत मजुरांना सेवेत कायम सामावून घेण्यात यावे, तसेच माहूत व चाराकटर पदाची सरळ सेवा भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना शामराव मुद्रकोलावार, गणू वेलादी, संतोष कोडाप, सुदीप रंगुवार आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
गजराजाची देखभाल करणारे अद्यापही अस्थायीच
By admin | Updated: December 27, 2014 22:51 IST