सिरोंचा : तालुक्यातील उत्तम रेतीघाटांची भरमार आहे. उत्कृष्ट दर्जाची रेती सहजरित्या उपलब्ध होते. मात्र अलिकडच्या काळात तालुक्यातील अनेक रेतीघाटांवर अवैधरित्या वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. हीच स्थिती येर्रावागू घाटावर दिसून येत आहे. मात्र महसूल विभाग निद्रावस्थेत असल्याने लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. तालुक्यात गौणखनिज व रेती भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. सध्य:स्थितीत रेतीघाटांचे लिलाव अद्यापही झाले नाहीत. मात्र येर्रावागू घाटावर रेती तस्कर मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करीत आहेत. दररोज अनेक ट्रॅक्टर रेती भरून दुसऱ्या गावांमध्ये जातात. मात्र महसूल विभागातील कोणतेचे अधिकारी रेती तस्करांवर कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे. सिरोंचा तालुका अहेरी उपविभागात अंतर्भूत आहे. उपविभागीय अधिकारी म्हणून जितेंद्र पाटील कार्यरत आहेत. परंतु त्यांची पकड तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठ्यांवर नसल्याचे अवैध रेती उपसाच्या मोठ्या प्रमाणावरून दिसून येत आहे.रेती उपसा किती प्रमाणात करावा याचे नियम धाब्यावर बसवून नदीपात्रात बेधडक रेतीचा अवैध उपसा केला जात आहे. अंकिसा- आसरअल्लीच्या मधोमध असलेल्या येर्रावागू नाल्यावर तीनवेळा पुलाचे बांधकाम पूल पावसाळ्यात वाहून गेल्यामुळे करण्यात आले. याच घाटावर रेतीचा अवैध उपसा जोरदार केला जात आहे. कारसपल्ली नाल्यावर रेतीचा अवैध उपसा होत असल्याचे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्यामुळे काही प्रमाणात या परिसरात रेती तस्करांना लगाम घालण्यात आला होता. परंतु येर्रावागू नाल्यावर स्थिती अतिशय गंभीर असल्याचे दिसून येत आहे. महसूल प्रशासन अवैध रेती तस्करांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)
येर्रावागू घाटावर रेतीचा अवैध उपसा
By admin | Updated: January 1, 2015 23:02 IST