गडचिरोली : राज्यातील कोरोना रुग्णांसोबत गडचिरोलीतही वाढत असलेल्या कोरोनाबाधितांमुळे सर्वांची चिंता वाढवली आहे. अशात जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत अंशत: लॉकडाऊन जाहीर केले. मात्र प्रत्यक्षात मंगळवारी त्याचा कोणताही प्रभाव गडचिरोलीच्या मार्केटमध्ये दिसून आला नाही. एवढेच नाही तर अनेकजण या अंशत: लॉकडाऊनमध्ये कोणकोणती बंधने आहेत आणि ती आपल्याला लागू होतात की नाही, याबद्दल संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून आले.
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या धर्तीवर जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी सोमवारी ३० एप्रिलपर्यंतचे निर्बंध नव्याने जारी केले. यात सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत जमावबंदी आदेश लागू असल्यामुळे पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मनाई आहे. तसेच रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत सार्वजनिक ठिकाणी फिरण्यावर बंदी राहणार आहे. यात अत्यावश्यक सेवावगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत पूर्ण लॉकडाऊन राहणार आहे. या नियमांसोबत खासगी व एसटी बस वाहतुकीसाठी आसन क्षमतेएवढेच प्रवाशी, तर टॅक्सी वाहनांसाठी (काळीपिवळी) ५० टक्केच प्रवासी आणि रेस्टॉरंट, खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी केवळ पार्सल सुविधा बंधनकारक करण्यात आली आहे. परंतु गडचिरोलीत पहिल्याच दिवशी याही नियमांची ऐशीतैशी केली जात होती. जणूकाही जिल्हाधिकाऱ्यांनी लादलेली बंधने आपल्यासाठी नाहीच, अशा अविर्भावात संबंधित लोक वावरत होते.
आरमोरी, देसाईगंजकडे जाणाऱ्या प्रवासी जीपमध्ये नेहमीप्रमाणेच आसन क्षमतेपेक्षाही जास्त प्रवासी भरले जात होते. काहीजण विनामास्क असताना त्यांना टोकणारा तिथे कोणीच नव्हता. त्यामुळे ते प्रशासनाच्या नियमांना जुमानत नाही की कोरोनाला, असा प्रश्न उपस्थित होत होता.
इंदिरा गांधी चौकाच्या परिसरातील काही बिर्याणी सेंटरपासून सर्व खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांकडे गिऱ्हाईकी सुरू होती. काही मिठाईच्या दुकानांतही ग्राहक खाद्यपदार्थ तिथेच खात होते.
विशेष म्हणजे सलूनच्या दुकानांनाही ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. पण शहरातील ४० टक्के सलून दुकाने सुरूच होती. एकाच रांगेतील काही दुकाने बंद तर काही सुरू असल्याचे दिसत होते. काही सलून विक्रेत्यांनी प्रशासकीय बंधनांबद्दल नाराजी व्यक्त केली. आम्हाला मास्क, सॅनिटायझर वापरण्यासारखी बंधने घाला; पण दुकानच बंद ठेवण्याची सक्ती करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
(बॉक्स)
अत्यावश्यक बाबींमध्ये वाढ
जिल्हाधिकाऱ्यांनी दि.५ ला जारी केलेल्या अंशत: लॉकडाऊनच्या आदेशात थोडी सुधारणा करत मंगळवारी काही अतिरिक्त बाबींना अत्यावश्यक सेवेत समाविष्ठ केले. त्यात पेट्रोलपंप, कार्गो सर्व्हिसेस, डाटा सेंटर्स, आयटी सर्व्हिसेस, शासकीय आणि खासगी सुरक्षा सेवा तसेच फळांची दुकाने आदींचा समावेश आहे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रत्यक्षरीत्या उपस्थित राहायचे आहे अशा विद्यार्थ्यांना रात्री ८ नंतर किंवा आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्येसुद्धा प्रवास करण्याची परवानगी राहणार आहे.
कार्यालयात ५० टक्के उपस्थिती
सहकारी संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व खासगी बँका, विद्युत पुरवठा कंपन्या, टेलिकॉम सेवा पुरवठादार, विमा, मेडिक्लेम कंपनी, औषधी उत्पादन/वितरण व्यवस्थापनासाठी असलेल्या कंपनीची कार्यालये सुरू राहतील. मात्र कार्यालये ५० टक्के उपस्थिती क्षमतेने तर जी कार्यालये कोविड-१९ साथरोग या कामकाजासंबंधित असतील ती १०० टक्के उपस्थितीत विभागप्रमुखांच्या निर्णयान्वये सुरू राहतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.