२०१९-२०२० या वर्षात वडेगाव येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या धान खरेदी केंद्रावर मार्च २०२१ पर्यंत शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यात आली. धान खरेदी केंद्र बंद हाेऊन जवळपास दाेन महिन्यांचा कालावधी उलटत आहे. परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या धानाचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. वडेगाव येथील केंद्रावर परिसराच्या १० ते १५ गावातील शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली. शासनाच्या आधारभूत धान खरेदी याेजनेचा लाभ लवकर मिळावा, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा हाेती. परंतु शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात धान चुकाऱ्याचे पैसे जमा झाले नाहीत. यासाठी अनेक शेतकरी वारंवार बॅंकेत तसेच केंद्रावर हेलपाटे मारून पैसे जमा झाले की नाहीत याबाबत विचारणा करीत आहेत. त्यामुळे लवकर धानाचे चुकारे अदा करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बाॅक्स
पावसाळी हंगामासाठी तजवीज कुठून करावी?
एक महिन्यानंतर पावसाळ्याला सुरुवात हाेणार आहे. सध्या खरीपपूर्व मशागतीला वेग आला आहे. तेव्हा धान विक्री केलेल्या रकमेतून पावसाळी हंगामासाठी कृषी निविष्ठांची तजवीज कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमाेर आहे. बियाणे, औषधी तसेच खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे आवश्यक प्रमाणात पैसा उपलब्ध नाही. धानाच्या पैशाच्या भरवशावरच शेतकरी पावसाळी हंगामातील खर्च करणार हाेते. परंतु त्यांना चुकारे वेळेवर मिळत नसल्याने पावसाळी हंगाम कसा करावा, अशी चिंता सतावत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून धानाचे चुकारे अदा करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.