गडचिराेली : ज्या दाम्पत्यांना अपत्यप्राप्ती हाेत नाही, वैद्यकीयदृष्ट्या ते यात सक्षम नसतात, अशा दाम्पत्यांना कायदेशीर प्रक्रियेतून अपत्य दत्तक घेता येते. जिल्हास्तरावर असलेल्या जिल्हा महिला व बाल संरक्षण विभागाच्या मार्गदर्शनात ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. पण २०१५ ते २०२० या सहा वर्षांच्या कालावधीत दत्तक बाळ मिळविण्यासाठी नोंदणी केलेल्या २४ दम्पत्यांपैकी एकाही दाम्पत्याला दत्तक बाळ मिळाले नसल्याची माहिती हाती आली आहे.
नाेंदणी केलेल्या जिल्ह्यातील दाम्पत्यांना दत्तक घेण्यासाठी मूल उपलब्ध असून, त्यासाठी तयार रहावे, असा एसएमएस दिलेल्या माेबाईल क्रमांकावर प्राप्त झाला. शिवाय इ-मेल आयडीवरही हा संदेश पाठविण्यात आला. मात्र दाम्पत्यांनी हा संदेश पाहिला नाही. परिणामी संधी येऊनही त्यांना दत्तक बाळ मिळाले नाही.
स्त्री किंवा पुरुष कुणीही मूल दत्तक घेऊ शकते. जर एखादे जाेडपे मूल दत्तक घेऊ इच्छित असेल, तर त्यांच्या लग्नाला कमीत कमी दाेन वर्षे पूर्ण झालेली असावीत आणि दत्तक घेण्यासाठी दाेघांची संमती असावी,पालकांचे वय व बाळाचे वय यामध्ये कमीत कमी २५ वर्षे अंतर असावे. दत्तक घेणाऱ्या व्यक्ती शारीरिक, मानसिकरित्या सामान्य स्थितीत असाव्या किंवा त्यांना आर्थिक स्थैर्य असावे. दाम्पत्यांपैकी कुणालाही गंभीर आजार नसावा. अशा कायदेशीर अटी, शर्ती आहेत. अनाथ बालक, आई-वडिलांनी साेडून दिलेले मूल किंवा जन्मदात्यांनी साेडून दिलेले मूल हे कायद्याच्या चाैकटीत बसत असेल, तर हे मूल दत्तक घेता येते. सर्वप्रथम पालकांनी त्यांचे नाव नाेंदणीकृत मान्यताप्राप्त संस्थांकडे नाेंदविणे आवश्यक आहे. कुमारी मातांची मुले, फेकलेले बाळ संस्थांमध्ये दत्तक देण्यासाठी ठेवली जातात.
मार्च २०२० अखेरीसपासून काेराेना महामारीची समस्या उद्भवल्यामुळे नाेंदणी केलेल्या पालकांना एकही दत्तक मूल देण्यात आले नाही. संसर्गाच्या भीतीने ही व्यवस्था करता आली नाही, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मूल किंवा मुलगी दत्तक घेण्यासाठी दिल्ली येथील केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाकडे त्यांच्या वेबसाईटवर ऑनलाईन नाेंदणी करावी लागते. साेबतच दाम्पत्याचे आधारकार्ड, पॅनकार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, विवाह नाेंदणी प्रमाणपत्र व वैद्यकीय प्रमाणपत्र अपलाेड करावे लागतात. शिवाय या ठिकाणी मूल दत्तक घेण्याचे कारणही नाेंदवावे लागते. दत्तक एजन्सी निवडावी लागते. सामाजिक कार्यकर्त्यांकडून हाेम स्टडी अहवाल तयार केला जाताे. हा अहवाल त्या दाम्पत्याच्या ई-मेल आयडीवरून अपलाेड केला जाताे. त्यानंतर अनुक्रम लागत असताे.
बाॅक्स....
वर्षनिहाय नाेंदणी केलेले दाम्पत्य
२०१५ - १
२०१६ - १
२०१७ - ५
२०१८ - ७
२०१९ - ४
२०२० - ६
बाॅक्स...
अवैधरित्या मूल दत्तक घेणे ठरताे गुन्हा
अधिकृत नाेंदणी न करता तसेच विशिष्ट कुटुंबाशी संपर्क साधून मूल दत्तक घेणे कायद्याने गुन्हा आहे. अशा दाम्पत्यावर बाल न्याय अधिनियम २०१५ चे कलम ८०, ८१ अन्वये कारवाई हाेते. मान्यताप्राप्त एजन्सीकडे रितसर नाेंदणी करून कायदेशिररित्या मूल दत्तक घेणे साेयीस्कर ठरते.
बाॅक्स....
जिल्ह्यात विशेष दत्तक संस्थेेचा अभाव
गडचिराेली जिल्ह्यात शासन मान्यताप्राप्त विशेष दत्तक एकही संस्था नाही. चंद्रपूर येथे किलबिल नावाची मान्यताप्राप्त दत्तक संस्था आहे. येथील जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयातर्फे याेग्य ती कार्यवाही करून या संस्थेकडे दत्तक घेण्यासाठीची मुले व मुली पाठविले जातात. दत्तक घेण्यासाठी या संस्थेकडे संपर्कही साधला जाताे.
बाॅक्स...
मुलांची मागणी अधिक
गडचिराेली जिल्ह्यात जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयामार्फत २०१२-१३ पासून अपत्य कायदेशीर दत्तक घेण्याची प्रक्रिया ऑनलाईनरित्या राबविली जात आहे. मुलींपेक्षा मुलांची मागणी दाम्पत्यांकडून अधिक हाेत असल्याची माहिती मिळाली आहे. मुले दत्तक घेण्याचे प्रमाण ७० टक्के आहे, तर मुलींचे प्रमाण ४० टक्के आहे.
बाॅक्स...
नाते संबंधातूनही मिळते दत्तक बाळ
नाते संबंधातूनही कायदेशीर दत्तक घेण्याची प्रक्रिया राबविली जाते. यासाठी दाम्पत्यांना ऑनलाईन नाेंदणी करावी लागते. ही नाेंदणी राज्य दत्तक संस्थांकडून दिल्ली येथील केंद्रीय संस्थेकडे नाेंदणी पाठविली जाते. ही प्रक्रिया साेपी आहे. यात अर्जासाेबत वंशावळ सादर करावी लागते.