कौशल्यविकास कार्यक्रम : बेरोजगारांना मिळाला दिलासागडचिरोली : रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाच्या मार्फतीने चालविण्यात येणाऱ्या जिल्हा कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन वर्षात सुमारे १ हजार १२० युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. शिक्षणाचे प्रमाण वाढण्याबरोबरच बेरोजगारीची समस्यासुद्धा निर्माण झाली होती. मात्र प्रत्येकच युवकाला शासकीय नोकरी देणे शासनाला अशक्य आहे. शिक्षित युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळावे किंवा खासगी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नोकऱ्या त्यांना मिळाव्या. या नोकऱ्या मिळण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य युवकांमध्ये निर्माण व्हावे, यासाठी शासनाने कौशल्य विकास कार्यक्रम मागील काही वर्षांपासून सुरू केला आहे. गडचिरोली जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाच्यावतीने जानेवारी २०१३ पासून डिसेंबर २०१४ पर्यंत या कार्यक्रमांतर्गत सुमारे १ हजार २९२ युवकांना आदरतिथ्य, बांधकाम व आॅटोमोबाईलचे तीन महिन्याचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणादरम्यान युवकांच्या निवास, भोजन, गणवेश व अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेली सर्वच साहित्य जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाच्यावतीने मोफत उपलब्ध करून दिली जातात. विशेष म्हणजे जी संस्था युवकांना प्रशिक्षण देते, त्या संस्थेला सदर युवकांना नोकरी उपलब्ध करून देण्याचे बंधन घालण्यात येते. खासगी क्षेत्रात गळेकापू स्पर्धा निर्माण झाली आहे. खासगी क्षेत्रामध्ये हजारोच्या संख्येने रोजगाराची साधने उपलब्ध असली तरी त्या व्यवसायाचे कौशल्य सदर युवकामध्ये असणे आवश्यक आहे. अन्यथा खासगी क्षेत्र युवकांना दारातही उभे होऊ देत नाही, ही पाळी युवकांवर येऊ नये, यासाठी कौशल्यविकास कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षण दिले जाते. याचा लाभ जिल्ह्यातील युवकांना झाला आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश युवक अत्यंत गरजू आहेत. बेरोजगारीच्या काळातही या युवकांना शहराच्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाल्याने युवकांनीसुद्धा समाधान व्यक्त केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश पालकांची आर्थिक परिस्थिती कमकूवत आहे. येथील युवकांमध्ये संघर्ष करण्याची तयारी असली तरी त्यासाठी आवश्यक असलेले आर्थिक पाठबळ नसल्याने सदर युवक स्पर्धेत टिकू शकत नाही. जिल्ह्यातील नोकऱ्या इतर जिल्ह्यातील युवकांकडून बळकावल्या जात असल्याने बेरोजगारीची समस्या आणखी तीव्र झाली आहे. अशा परिस्थितीत रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाने गडचिरोली जिल्ह्यांमधील बेरोजगार युवकांमध्ये रोजगाराची आशा जागृत केली आहे. यामुळे इतर युवकांना प्रेरणा मिळाली असून सदर युवक सुद्धा प्रशिक्षणासाठी अर्ज करीत आहेत. (नगर प्रतिनिधी)
११२० युवकांना रोजगार
By admin | Updated: January 1, 2015 23:02 IST