चामोर्शी शहरातील गाव तलावाचा दरवर्षी लिलाव केला जातो. लिलावानंतर तलावाची मालकी प्राप्त झालेल्या मत्स्य सहकारी संस्था तसेच नागरिक पावसाळ्यात मत्स्यबीज टाकतात. साधारणत: दिवाळी व संक्रातीनंतर या मत्स्यबीजाची बऱ्यापैकी वाढ होते. यंदाही चामोर्शीच्या गाव तलावात मासोळ्याचे प्रमाण चांगले आहे व वाढही बरीच झाली आहे. मात्र या तलावाला जलपर्णी (इकाॅर्निया)वनस्पतीने विळखा घातल्याने मासेमार बांधवांना मासे पकडण्यासाठी तलावात योग्यप्रकारे जाळे टाकता येत नाही. त्यामुळे शहरातील मासेमार बांधव त्रस्त झाले आहेत. सध्या या तलावात संपूर्ण क्षेत्रात जलपर्णी वनस्पती वाढली असल्याने संपूर्ण तलाव हिरवेगार दिसून आहे. संबंधित विभागाने या तलावातील गाळाचा पूर्णत: उपसा करून जलपर्णी वनस्पतीची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. अशा प्रकारची मागणीही शहरातील केवट, ढिवर व भोई समाजबांधवांकडून सातत्याने होत आहे.
बहुउपयाेगी तलाव
चामाेर्शी येथील गाव तलावाचा उपयोग महिलांना कपडे धुण्यासाठी होताे. तसेच याच तलावात गणपती, शारदा, दुर्गादेवीच्या मूर्तीचे तसेच गौरीचे विसर्जन केले जाते. हा तलाव बहुउपयाेगी आहे. त्यामुळे या गाव तलावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रशासनाने चामोर्शी लगतच्या या गाव तलावातील गाळ उपसा करून जलपर्णी वनस्पतीची विल्हेवाट लावण्याची मागणी होत आहे.