आनंद बंग यांचे मत : व्यसनांवरच होतो बहुतांश खर्चरत्नाकर बोमीडवार चामोर्शीमहाराष्ट्रातील अतिमागास असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा विकास व्हावा, यादृष्टीने शासनाने स्वतंत्र गडचिरोली जिल्हा निर्माण केला. परंतु मागासलेपणा दूर झाला नाही. तंबाखू, गुटखा, खर्रा, दारू या अनेक व्यसनांमुळे लोकांची मानसिक, शारीरिक, आर्थिक, कौंटुबिक स्वास्थ बिघडत गेले. हीच बाब गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला मारक ठरत आहे. व्यसनमुक्ती झाल्याशिवाय गडचिरोली जिल्ह्याचा विकास होऊ शकत नाही. त्यामुळे व्यसनमुक्तीला आपले व सरकारचे प्रथम प्राधान्य आहे, असे मत मुख्यमंत्र्यांचे आरोग्य सल्लागार डॉ. आनंद बंग यांनी लोकमत प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. श्री सत्यपाल महाराज यांच्या व्यसनमुक्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. आनंद बंग चामोर्शी येथे आले होते. ते म्हणाले की, शासन सामाजिक संस्था व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून भारतात एकमेव गडचिरोली जिल्ह्यात व्यसनमुक्तीचा उपक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचे अध्यक्ष स्वत: मुख्यमंत्री आहेत. २००८-०९ च्या सर्वेक्षणानुसार एका वर्षात ७३ कोटी रूपयांचा तंबाखू सेवन केल्या गेला. हा केवळ आरोग्य किंवा नैतिकेचा प्रश्न नव्हे तर आर्थिक प्रश्न आहे. तंबाखू, खर्रासोबतच दारू नियंत्रणात आल्यास गडचिरोली जिल्ह्याचा विकास नक्की होईल. दारूबंदी १०० टक्के यशस्वी होत नसली तरी नियंत्रणात आणणे शक्य झाले आहे. दारू, तंबाखूमुळे सरकारला महसूल मिळतोे. परंतु यापेक्षा कित्येकतरी पटीने पैसा आरोग्यावर खर्च करावा लागतो. लोकांचा पैसा व्यसनात खर्च होते. त्यामुळे विकासात खिळ बसते. १९८७ पासून १९९२ पर्यंत व्यसनमुक्तीची चळवळ जिल्ह्यात सुरू केली होती. या चळवळीचा परिणाम म्हणजे जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय शासनाने घेतला. वैज्ञानिक सत्य आहे की, गरोदरपणात गुटखा, तंबाखू सेवन केल्यास कुपोषित बाळ जन्माला येते. आरोग्य सुधारणे, आर्थिक विकास करणे, महिलांचे संरक्षण यासाठी व्यसनमुक्तीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सदर उपक्रम तीन वर्षांचा आहे. ढोंगी, राजकीय नेत्यांवर नियंत्रण ठेवण्यास प्रसारमाध्यमांची साथ हवी, जिल्ह्यात पत्रकारांची सुदैवाने साथ मिळत आहे, असे सांगून डॉ. आनंद बंग म्हणाले, शासन, सामाजिक संस्था, टाटा ट्रस्टच्या माध्यमाने सिव्हील हॉस्पिटलमध्ये १० लाख रूपये किंमतीची प्रगत टीव्ही मशिन देण्यात आली आहे. गावातील युवकांना रोजगार, गावात वीज, एसटीची व्यवस्था, जलयुक्त शिवारातून मामा तलावांच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले आहेत. या बाबींना व्यसनमुक्तीची साथ मिळाल्यास जिल्ह्याचा आर्थिक विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
व्यसनमुक्तीने गडचिरोलीचा विकास
By admin | Updated: October 26, 2016 01:55 IST