धानोरा : तालुक्यातील राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल दोन वर्षापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रपट्यासह वाहून गेला. दरवर्षी पावसाळ्यात या गावातील विद्यार्थी व नागरिकांना पूल अभावी नवरगावमार्गे अधिकचे १५ किमी अंतर कापून धानोरा तालुका मुख्यालय व गडचिरोली मुख्यालय गाठावे लागते.
पांदण रस्ते मोकळे करण्याची मागणी
गडचिरोली : शेतीकडे जाणाऱ्या मार्गाला ग्रामीण भागात सगर असे संबोधले जाते. रोजगार हमी योजनेंतर्गत याच रस्त्यांना पांदण रस्ता म्हटले जाते. या पादंण रस्त्यांवर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शेतीकडे जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. सर्व्हे करून या मार्गाचे रोहयोच्या माध्यमातून बांधकाम करणे गरजेचे झाले आहे.
रस्त्यावर आलेली झाडे तोडण्याची मागणी
रांगी : लोहारा ते रांगी, पिसेवडधा ते रांगी या रस्त्यावर अनेक झाडे रस्त्यावर आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना अडचण येते. वन विभागाने या झाडांची तोड करावी, अशी मागणी आहे. मात्र याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
नागरिक उघड्यावरच जातात शौचास
गडचिरोली : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले. मात्र बांधलेल्या शौचालयाचा १०० टक्के वापर होताना दिसून येत नाही. अद्यापही ग्रामीण भागातील नागरिक उघड्यावर शौचास जात आहेत. अनेक गावामध्ये शौचालयांचे बांधकाम करण्यात आले आहे, हे खरे पण त्यांचा उपयोग होताना दिसत नाही.
केरोसीनचा पुरवठा वाढविण्याची मागणी
एटापल्ली : राज्य शासनाने शहरी व ग्रामीण भागासाठी केरोसीनचे परिमान निश्चित केले आहे. केरोसीनचा कोटा कमी झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक अडचणीत आले आहेत. अनेक गावांमध्ये अजूनही वीजपुरवठा झाला नाही. त्याचबरोबर दुर्गम भागातील गावांमध्ये बरेच दिवस वीज राहत नाही. त्यामुळे नागरिकांना केरोसीनचा पुरवठा वाढविण्याची मागणी आहे.
कुटुंब नियोजनाबाबत जनजागृतीचा अभाव
गडचिरोली : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले तरी यामध्ये पुरूषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजनात महिला आघाडीवर आहेत. पुरूषांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. नसबंदी नंतर पुरूषाला अनुदान मिळत असले तरी बरेच पुरूष कमजोरी येत असल्याचा बहाना करून तयार होत नाही.
कॉम्प्लेक्स पर्यंत पथदिवे लावण्याची गरज
गडचिरोली : स्थानिक बाजार वॉर्ड ते कॉम्प्लेक्स पर्यंतच्या गडचिरोली - चंद्रपूर मार्गावर पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळेस वाहतुकीस अडचणी येत आहेत़ नेहमीच वर्दळ राहणाऱ्या या मार्गावर पथदिवे लावण्यात आले नाही़ जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्ण भरती राहत असल्याने त्यांचे नातेवाईक रात्री उशिरापर्यंत रुग्णालयाकडे ये-जा करीत असतात. त्यामुळे पथदिवे लावण्याची मागणी आहे.
झिंगानूरातील माेबाईल सेवा कुचकामी
सिरोंचा : तालुक्यातील झिंगानूर भागात भ्रमणध्वनी सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने या भागातील भ्रमणध्वनी धारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. दुसऱ्यांशी संपर्क होत नसल्याने कामे अडत आहेत. अंकिसा भागातही नेटवर्कची समस्या गंभीर बनली आहे. भ्रमणध्वनी अर्थात दूरसंचार सेवा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. मात्र चुकीच्या नियाेजनामुळे गडचिराेली सारख्या दुर्गम भागात ही सेवा प्रभावी ठरली नाही.
रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मागणी
गडचिरोली : जिल्ह्यातील बहुतांश मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सदर खड्डे बुजविण्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. बांधकाम विभागाने याकडे वेळीच लक्ष घालून खड्डे बुजवावे, अशी मागणी आहे.
जि.प. कॉलनीतील घरांची दुरवस्था
गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी ५०० घरांची स्वतंत्र कॉलनी वसविण्यात आली आहे. या कॉलनीतील घरांची दुरवस्था झाली आहे. अनेक घरांचे पडझड झाली असल्याने या घरांमध्ये राहणे ही कठीण झाले आहे. सदर घरे दुरूस्त करावी, अशी मागणी होत आहे.
कर्मचारी करतात ५० किमीवरून अपडाऊन
धानोरा : तालुक्यातील अनेक कर्मचारी गडचिरोली येथे राहून सेवा देतात. ५० किमी अंतरावरून आल्यावर त्यांची काम करण्याची इच्छा राहत नाही. शारीरिक व मानसिकदृष्ट्या थकलेले राहतात. त्यामुळे त्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करावे, अशी मागणी आहे.
कमलापुरातील समस्यांकडे दुर्लक्ष
कमलापूर : अहेरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळख असलेल्या कमलापूर येथे सोयीसुविधांची भरमार असणे जनतेला अपेक्षित होते. परंतु कित्येक वर्षांपासून गावातील नागरिकांना मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
तपासणी नाक्यावर पुरेसे कर्मचारी द्या
आरमोरी : तालुक्यातील नाक्यावर केवळ अपुरे कर्मचारी तैनात आहेत. या कर्मचाऱ्यांना सतत तीन पाळीमध्ये आपली जबाबदारी निभवावी लागत आहे. एका कर्मचाऱ्याला किमान १६ तास काम करावे लागत आहे. त्यामुळे नाक्यावरील कर्मचारी त्रस्त आहेत. कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची मागणी होत आहे.
पट्टे वाटपासाठी अट शिथिल करा
गडचिरोली : गैर आदिवासी नागरिकांना वनपट्टा देण्यासाठी शासनाने ७५ वर्षांपासून जमिनीवर अतिक्रमण करून असल्याचा दाखला जोडावा लागतो. सदर अट शिथिल करण्याची मागणी आहे. शेकडो दावे तहसीलदारांमार्फत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. मात्र ७५ वर्षांची अट असल्याने अनेक दावे प्रलंबित आहेत.
मोकाट जनावरांमुळे रहदारी बाधित
एटापल्ली : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभे राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत असून वाहनधारकांना नेहमी अपघाताची भीती असते. अनेक मार्गांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते.