गडचिरोली : जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यातील १४८ शाळा इमारती दुरूस्तीचे काम मंजूर करण्यात आले. मात्र सदर कामे डीपीडीसीतून न घेता सर्व शिक्षा अभियानातून घेण्यात आले. यावर बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार, सभापती सुवर्णा खरवडे, अजय कंकडालवार आदीसह काही सदस्यांनी आक्षेप घेऊन या कामाबाबतची निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. यामुळे या कामांना अद्यापही सुरूवात करण्यात आली नसल्याची माहिती आहे.डीपीडीसीमधून अंदाजे साडेसात कोटींची शाळा इमारती दुरूस्तीची कामे मंजूर करण्यात आली. या कामाच्या ई-निविदा प्रक्रियेची जाहिरात एका साप्ताहिक ात व दैनिक वृत्तपत्रात देण्यात आली. त्यानंतर या कामांबाबत नियमबाह्य पध्दतीने निविदा काढण्यात आल्या. सदर नियमबाह्य प्रकार निदर्शनास आल्यानंतर बांधकाम सभापती, अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वात सभापती सुवर्णा खरवडे, अजय कंकडालवार, जि.प. सदस्य अमोल मारकवार, वर्षा कौशिक, मनोहर पोरेटी, पुनम गुरनुले आदींनी जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांना ७ नोव्हेंबर २०१४ रोजी निवेदन देऊन सदर नियमबाह्य निविदा प्रक्रिया तत्काळ रद्द करून नियमानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी केली. मात्र या संदर्भात जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अद्यापही काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे सदर कामे थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते. या संदर्भात जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी भ्रमणध्वनीला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रीया जाणून घेता आली नाही. (स्थानिक प्रतिनिधी)
शाळा दुरूस्तीच्या कामाला विलंब
By admin | Updated: December 27, 2014 01:38 IST