गडचिरोली : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धानाची खरेदी निम्म्याने घटली आहे. मागील वर्षी डिसेंबरपर्यंत सुमारे दीड लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली होती. यावर्षी मात्र २६ डिसेंबरपर्यंत केवळ १ लाख ५ हजार ३११ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या मार्फतीने धान खरेदी केली जाते. सहकारी संस्थेला प्रत्येक क्विंटलमागे २५ रूपये कमिशन दिल्या जाते. यावर्षी ४३ विविध कार्यकारी सहकारी संस्था ४४ केंद्रांच्या माध्यमातून धान खरेदी करीत आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किंमतीनुसार धानाची खरेदी करण्यात येते. शासनाने अतिउत्तम धानाला १ हजार ४०० रूपये तर साधारण धानाला १ हजार ३६० रूपये भाव निश्चित केला आहे. याअंतर्गत ४४ ही धान खरेदी केंद्रांवर २६ डिसेंबरपर्यंत १ लाख ५ हजार ३११ क्विंटल साधारण धानाची खरेदी करण्यात आली आहे. मागील वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत सुमारे दीड लाख क्विंटल धान खरेदी झाली होती. यावर्षी पावसाचे प्रमाण जिल्ह्यात कमी झाले. त्यामुळे हेक्टरी उत्पादन जवळपास ४ क्विंटलने घटले आहे. त्याचा परिणाम म्हणजे यावर्षी धानाची आवक मागील वर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. यावर्षी पावसाला उशीर झाल्याने धानपीक उशीरा निघले. त्यामुळे अजुनपर्यंत शेतकऱ्यांचे चुरणे झाले नसल्याने धानाची आवक धान खरेदी केंद्रावर पाहिजे त्या प्रमाणात दिसून येत नाही. गडचिरोली जिल्ह्यात चांगल्या दर्जाच्या धानाचे उत्पादन होते. या धानाला खासगी व्यापारीही चांगला भाव देतात. त्याचबरोबर सदर व्यापारी गावात येऊन खरेदी करतात व धानाचे पैसे सुद्धा नगदी देतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल खासगी व्यापाऱ्यांकडे वाढत चालला आहे. धान खरेदी केंद्राला धान दिल्यास १० ते १५ दिवस पैसे खात्यात जमा होत नाही. या सर्व बाबींमुळे दुर्गम भागातील शेतकरीसुद्धा आता आधारभूत धान खरेदी केंद्राकडे पाठ फिरवू लागला आहे. (नगर प्रतिनिधी)
धान खरेदीत निम्म्याने घट
By admin | Updated: December 29, 2014 23:43 IST