काेराेनामुळे देशात आतापर्यंत जवळपास १.९० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २८ लाख लोक उपचार घेत आहेत.
याचा अभ्यास करण्यासाठी म्हैसूर येथील केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेद्वारे सेरोलोजीकल सर्वेक्षण सुरू करण्यात आले. या सर्वेक्षणाची मुख्य जबाबदारी गडचिरोली जिल्ह्यातील शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश एम. हलामी यांच्याकडे साेपवली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक शिबिर आयोजित करून नागरिकांची तपासणी करण्यात आली. काही नमुने पुढील तपासणीसाठी दिल्ली येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यामध्ये सीएसआयआरमधील सर्व शास्त्रज्ञांचा समावेश होता.
एकूण १० हजार ४५७ लोकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १ हजार ५८ (१०.१४ टक्के) लोक कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले. त्यांच्यात हर्ड इम्युनिटी नाही, १० टक्के लोकांमधे रोगप्रतिकारशक्ती जास्त असल्याने त्यांना कोरोनाचा धोका कमी, शाकाहारी लोकांना धोका कमी असल्याचे निदर्शनास आले. तसेच पुरूषांपेक्षा स्त्रियांना
धोका अधिक, तर दाट लोकवस्तीमध्ये कोरोना अधिक प्रमाणात पसरू शकतो. ‘ए’ आणि ‘एबी’ रक्तगट असणाऱ्या लोकांना कोराेनाची लागण लवकर होऊ शकते तर ओ रक्तगट असणाऱ्यांना शक्यता कमी असेल असे या सेरो सर्वेक्षणात दिसून आले. एप्रिल महिन्यात याबाबतची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. काेराेना संसर्ग टाळण्यासाठी नियमित मास्क वापरणे, शारीरिक अंतर ठेवणे, लक्षणे दिसल्यास संबंधित व्यक्तीला गृह विलगीकरणात ठेवणे, रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे, आराेग्य विभागाने लसीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करायला हवी, असे मत डॉ.प्रकाश हलामी यांनी व्यक्त केले आहे.