गडचिरोली : स्थानिक पोलीस मुख्यालयामध्ये गडचिरोली वनवृत्तांर्गत येणाऱ्या ३२ वनरक्षकांनी कमांडोचे १ महिना कालावधीचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. १ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत झालेल्या प्रशिक्षणाचा समारोप ३० डिसेंबर रोजी करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी अप्पर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्य प्रादेशिक वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी, उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला, अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, नक्षलविरोधी अभियानाचे पोलीस उपअधीक्षक एम. जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षणार्थ्यांनी शस्त्रास्त्र हाताळणी कौशल्याचे प्रदर्शन केले. प्रशिक्षणामध्ये उत्तम प्रावीण्य मिळणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. लेखी चाचणीत महासिंग बलदु कुंजम, मैदानी चाचणीत अनिल सुरेश नैताम, महासिंग बलदु कुंजम यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. गोळीबार चाचणीत उमाजी खोब्रागडे प्रथम आला. सर्वाेत्तम प्रशिक्षणार्थी म्हणून अनिल सुरेश नैताम यांना गौरविण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक वनसंरक्षक रेड्डी यांनी प्रशिक्षणामुळे वनकर्मचारी कर्तव्यावर असतांना होणाऱ्या दुर्घटना कमी होतील, असे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक कऱ्हाळे, मोहुर्ले व सर्व प्रशिक्षकांचे मान्यवरांनी उत्तम प्रशिक्षण दिल्याबद्दल कौतूक केले.
३२ वनरक्षकांना कमांडोचे प्रशिक्षण
By admin | Updated: December 31, 2014 23:25 IST