एटापल्ली : तालुक्यातील अनेक गावांमध्ये शासनाच्या विविध याेजनेतून रस्ता, नाली, समाजभवन, छाेटे-माेठे पूल आदीसह विविध कामे मंजूर करण्यात आली असून, ती थंडबस्त्यात आहे. प्रलंबित असलेली कामे यंत्रणेने तत्काळ मार्गी लावावे, असे निर्देश आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले.
येथील पंचायत समितीच्या सभागृहात १५ जुलै राेजी गुरूवारला काेराेना व इतर विकासात्मक कामांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी ते बाेलत हाेते. याप्रसंगी मंचावर जि. प.च्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, जिल्हा परिषद सदस्य ग्यानकुमारी कौशिक, सभापती जनार्धन नल्लावार, संवर्ग विकास अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर गव्हाणे, माजी सभापती बेबीताई लेकामी, पंचायत समिती सदस्य निर्मला गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी तालुक्यातील कोरोना स्थिती व कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयीची माहिती जाणून घेतले. कोरोना मुक्तीसाठी प्रत्येक गावात लसीकरण होणे अत्यावश्यक असून, यात राजकीय व सामाजिक पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन अधिकारी व कर्मचारी युद्धस्तरावर मोहीम राबवून लसीकरणाची संख्या वाढविण्यासंदर्भात आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.
तालुक्यातील कामांमध्ये पारदर्शकता ठेवावी, असा सल्ला देत निधीचा दुरुपयाेग झाल्यास आपण मुळीच खपवून घेणार नाही, अशी तंबी ग्रामसेवक व अभियंत्यांना दिली.
यावेळी आरोग्य, शिक्षण, सिंचन, अंगणवाडीतील बालकांचे पोषण आहार, अंगणवाडी इमारती, पेसा निधी कामे, दलितवस्ती सुधार योजना, घरकूल आदींच्या कामांचा आढावा घेतला. व्यवस्थित कामे न करणाऱ्यांना कानपिचक्या व प्रामाणिकपणे काम करीत असणाऱ्या ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांची त्यांनी काैतुक केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दौलत दहागावकर, महिला तालुकाध्यक्ष ललिता मडावी, शहराध्यक्ष पोर्णिमा श्रीरामवार, प्रसाद नामेवार, मिथुन जोशी, विनोद पत्तीवार, तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामसेवक उपस्थित होते.
बाॅक्स....
नावीण्यपूर्ण कामास निधी कमी पडू देणार नाही
कोणत्या हेडखाली कसा निधी येताे, त्या निधीचा उपयाेग कसा करायचा, टेंडर प्रक्रिया कशी राबवायची, काेणत्या पद्धतीने काम केल्यास पारदर्शकता असते, याबाबत आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. गावाचा व जनतेचा पैसा कोणाच्या दबावाखाली व मनमर्जीप्रमाणे न वापरता विकास व लोकोपयोगी कामासाठी वापरण्यात यावा, असा सल्ला दिला. तसेच गावाच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण कामे सुचविल्यास निधीची कमतरता भासू देणार नाही, यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.