प्रदीप बोडणे - वैरागडतीळ संक्रांतीचा सण आटोपला की, झाडीपट्टीतील माणसाला शंकरपट आठवू नये, असे कसे होणार! झाडीपट्टीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे शंकरपट. गावाच्या बाहेर निर्धारित केलेल्या मोकळ्या लांबलांब जागेत दोनही बाजुला दोन छकडे उभे राहू शकतील, अशी आखलेली जागा म्हणजे ‘दाण’. हे ठिकाण पंचक्रोशीतील लोकांचा शंकरपट. या ठिकाणी दूर-दुरून पटशौकिन आपल्या बैलजोड्या घेऊन येत असत आणि करारानुसार ठरलेल्या बैलजोडी पैज लागली की, दोनही जोड्या एकमेकांविरूद्ध उभ्या ठाकून वेगाने धावत सुटत हा रोमांचकारी क्षण असायचा. परंतु आता शंकरपटावर कायद्याची अनेक बंधने आलीत त्यामुळे गावागावातील शंकरपट बंद होऊ लागले. जे शंकरपट भरतात त्यातही जुना माहोल राहिला नाही. त्यामुळे पटप्रेमी झाडीपट्टीतील लोक आता मनोरंजनाच्या दुसऱ्या साधनांकडे वळले आहेत. पूर्वी सकाळी शंकरपट भरायचा व रात्री नाटकाचे प्रयोग गावातच पार पडायचे. परंतु आता पटाला कायद्याचे ग्रहण लागले. त्यामुळे त्याची जागा आता मंडईने घेतली आहे. झाडीपट्टीतील खरीपाचा हंगाम संपला आणि रबी हिरवे पीक शेतात डोलू लागले की, बारा महिने मातीत खपणाऱ्या शेतकऱ्याचा विश्रांतीचा काळ सुरू होतो, याला सुगीचे दिवस म्हटल्या जाते. श्रमाच्या मोबदल्यात गाठीला आलेले चार पैसे खर्च करण्यासाठी नातेवाईकांच्या भेटीगाठी घेण्यासोबतच रोटीबेटी व्यवहार करण्यासाठी पूर्वी गावागावात शंकरपट आणि रात्री मनोरंजनासाठी दंडार, तमाशा, गोंधळ भरविला जात होता. या काळात मनोरंजनाची साधने लोककलाच होती. परंतु झाडीपट्टी रंगभूमीचा पाया या लोककलांनी मजबूत केला. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात नाट्य मंडळ तयार झाले. त्याच्या संचालनाचे केंद्र वडसा (देसाईगंज) हे पूर्वीही होते व आजही आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात नवरगाव, गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी येथील कलाकारांनी या रंगभूमिवर आपला ठसा उमटविला. आज झाडपट्टी रंगभूमितील अनेक गाव नाटकाचे प्रयोग आयोजित करतात. या नाटकांना या भागातील अनेक मातब्बरांनी राजाश्रय दिला आहे. त्यांच्या आर्थिक मदतीवर नाटकाचे प्रयोग आयोजित केले जातात. मनोरंजनाची अनेक साधने आली असली तरी शंकरपटाचे शौकिन व नाटकाचे दर्दीरसीक आजही कमी झालेले नाहीत. मकरसंक्रांत होताच होळीपर्यंत हे नाटक गावागावात आता धूम माजवित राहणार आहे. धार्मिक विषयांवरील नाटकांसोबतच सामाजिक, कौटुंबिक विषयांवरही नाटक आता झाडीपट्टी रंगभूमिचा रसीक तेवढ्याच आवडीने पाहतो, असे गेल्या काही वर्षात दिसून आले आहे. या रंगभूमीवर आता हिंदी व मराठी चित्रपटातील बॉलिवूड स्टारही आपली कला सादर करण्यासाठी मुंबई, पुण्यावरून दाखल होत आहे. ते या भागातील नाट्यवेड्या रसिकांच्या आग्रहामुळेच.
कायद्याच्या बंधनात अडकला शंकरपट; झाडीपट्टीत मंडई जोरात
By admin | Updated: January 15, 2015 22:50 IST