पीओची भेट : चौकशी अहवाल आयुक्तांना सादरएटापल्ली : एटापल्ली तालुक्याच्या पंदेवाही येथील विनोबा भावे आश्रमशाळेत विद्यार्थी आजारी पडत आहेत. म्हणून गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पूजा करून शाळेला मिरची व लिंबू बांधण्याचा प्रकार करण्यात आला होता. या प्रकाराबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासकीयस्तरावर प्रचंड खळबळ उडाली. आदिवासी विकास विभागाच्या नागपूर येथील आयुक्तांनी या संदर्भात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांना तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या अहलवालानंतर शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक ए. जी. शेंद्रे यांच्यावर पदावनतीची कारवाई करण्यात आली, अशी माहिती मिळाली आहे. या शाळेत वर्ग १ ते १० पर्यत शिक्षणाची सोय असून ४०० विद्यार्थी शिक्षण घेतात.१ आॅगस्ट रोजी सुनिता ओक्सा या मुलीचा मलेरियाने मृत्यू झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आजारी पडलेत. व त्यानंतर काहींनी शाळा सोडून घरचा रस्ता पकडला. त्यामुळे शाळेत ३३१ विद्यार्थी शिल्लक होते. सध्या १६० विद्यार्थी शिल्लक राहिले आहेत. सहाय्यक प्रकल्प अधिकारी राचलवार यांनी या शाळेला भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी दोन दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर त्यांनी आपला अहवाल आदिवासी विकास विभागाचे नागपूर येथील आयुक्तांना सादर केला. त्यानंतर माध्यमिक मुख्याध्यापकावर ही पदावनतीची कारवाई संस्थाचालकांनी केली आहे.
पंदेवाही आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकावर कारवाई
By admin | Updated: January 1, 2015 23:01 IST