अहेरी : येथील उपजिल्हा रूग्णालयात विविध आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रूग्णालयात डिसेंबर या एका महिन्यात मलेरियाचे तब्बल ४०८ रूग्ण बाधित आढळून आल्याने रूग्णालय प्रशासनात खळबळ माजली आहे. ५० खाटांची व्यवस्था असलेल्या अहेरी उपजिल्हा रूग्णालयातील आंतर रूग्ण विभागात सध्या कुटुंब कल्याण योजनेचे २३ व इतर ५० पेक्षा अधिक रूग्ण असल्याने या रूग्णालयाची व्यवस्था रूग्णांसाठी कमी पडत आहे. यातच डिसेंबर महिन्यात मलेरियाचे १२१ रूग्ण दाखल झाले. बाह्यरूग्ण ८८७ असे एकूण ४०८ मलेरिया बाधित रूण आढळून आले आहे. सदर रूग्णसंख्या डिसेंबर महिन्यातील केवळ २० दिवसाची आहे. अहेरी उपजिल्हा रूग्णालयात डॉक्टरांची कमतरता असून गेल्या वर्षभरापासून येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञानाचे पद रिक्त आहे. मधुमेह तपासणीकरीता लागणारे स्ट्रीप्सचा पुरवठा जिल्हा सामान्य रूग्णालयात या रूग्णालयात करण्यात आला नाही. त्यामुळे अहेरी परिसरातील मधुमेह तपासणीकरीता मोठी अडचण जाणवत आहे. या रूग्णालयात सिरोंचा, भामरागड, एटापल्ली आदी तालुक्यातील रूग्ण मोठ्या संख्येने दाखल होत असतात. वाढत्या रूग्णसंख्येच्या तुलनेत खाटांची व्यवस्था कमी पडत असून डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. या रूग्णालयात अनेक युनिट असून या युनिट अंतर्गत एकूण २५ कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. या रूग्णालयाच्या व्यवस्थेकडे लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)
एका महिन्यात आढळले मलेरियाचे ४०८ रूग्ण
By admin | Updated: December 30, 2014 23:33 IST