आरोग्य यंत्रणा सुस्त : दुर्गम भागातील तालुक्यांमध्ये कुपोषणाची समस्या तीव्र; भावी पिढी धोक्यातगडचिरोली : आरोग्य विभागाच्या वतीने नुकतेच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्हाभरात सुमारे १८ हजार १४२ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. कुपोषणमुक्तीसाठी शासनाकडून कोट्यवधी रूपये खर्च करण्यात येत असले तरी कुपोषणाची समस्या कमी न होता, ती दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे दिसून येते.गडचिरोली या नक्षलग्रस्त व मागास जिल्ह्यात शासनाचीच आरोग्यसेवा आहे. दुर्गम व अतिदुर्गम भागात नागरिकांचा वास्तव्य असून दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचे प्रमाण ७० टक्क्यावर आहे. जवळजवळ पाच लाखांपेक्षा अधिक नागरिक दारिद्र्य रेषेखाली आहे. त्यामुळे आरोग्यविषयक जाणीवांविषयी त्यांच्यामध्ये कमालीचा अभाव असल्याचे चित्र दिसून येते. भामरागड तालुक्यात ही बाब अतिशय प्रकर्षाने पुढे आली आहे. राज्यपालांनी दत्तक घेतलेला हा तालुका जसा विकासात मागे आहे, तसेच आरोग्य जाणीवांच्या दृष्टीनेही मागे आहे. भामरागड तालुक्यात कमी वजनाचे ९३१ तर अतिकुपोषित २५९ मुले आढळल्याचे आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. भामरागड तालुक्यात लाहेरी, कोठी, ताडगाव, भामरागड येथे आरोग्य केंद्र आहेत. मात्र येथे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची ६० टक्क्यावर अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांना आरोग्यविषयक सोयीसुविधांचा मिळत नाही. अनेक रुग्णांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. तसेच पालकांमध्ये अशिक्षितता व अज्ञान मोठ्या प्रमाणावर असल्याने अंगणवाडीतही मुलांना दाखल केले जात नाही. परिणामी या तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर तालुक्यांची असून मे महिन्यात आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात १८ हजार १४२ बालके कुपोषणाच्या गंभीर श्रेणीत असल्याचे आढळून आले आहे. त्यातील ३ हजार ४५७ बालके अतिशय गंभीर अवस्थेत आहे. त्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आरोग्य यंत्रणा उदासीन दिसून येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्ह्यातील १८ हजार बालके कुपोषणाच्या विळख्यात
By admin | Updated: August 23, 2015 01:55 IST