गायक झुबीन गर्ग यांचा मृत्यू की हत्या? सिंगापूर पोलिसांच्या खुलाशानंतर खळबळ, पुढच्या वर्षी येणार अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 14:39 IST2025-12-19T14:35:01+5:302025-12-19T14:39:09+5:30
झुबीन गर्ग यांच्या मृत्यूवरून आसाममध्ये राजकारण तापले असून सिंगापूर पोलिसांनी खळबळजनक दावा केला आहे.

गायक झुबीन गर्ग यांचा मृत्यू की हत्या? सिंगापूर पोलिसांच्या खुलाशानंतर खळबळ, पुढच्या वर्षी येणार अहवाल
Zubeen Garg death case: प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता आंतरराष्ट्रीय आणि राजकीय वळण मिळाले आहे. सिंगापूर पोलीस दलाने गुरुवारी स्पष्ट केले की, झुबीन गर्ग यांच्या मृत्यूमध्ये आतापर्यंतच्या तपासात कोणताही घातपाताची प्रकार आढळलेला नाही. मात्र, दुसरीकडे आसाम पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केल्याने भारत आणि सिंगापूरमधील तपास यंत्रणांच्या दाव्यांमध्ये तफावत दिसून येत आहे.
सिंगापूर पोलिसांचे अधिकृत वक्तव्य
सिंगापूरमधील सनटेक सिटी येथे आयोजित ईशान्य भारत महोत्सवात सादरीकरणासाठी गेलेल्या झुबीन गर्ग यांचा समुद्रात पोहताना मृत्यू झाला होता. या घटनेचा तपास सुरू असून सिंगापूर पोलिसांनी म्हटले की, "प्राथमिक तपासात कोणताही कट किंवा घातपात झाल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. पोलीस अद्याप व्यावसायिक पद्धतीने तपास करत आहेत. जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये." तसेच तपासाचा अहवाल स्टेट कोरोनरकडे सोपवला जाईल. जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये यावर सार्वजनिक सुनावणी होऊन मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट केले जाईल, सिंगापूर पोलिसांनी सांगितले.
आसाम पोलिसांचे खळबळजनक पाऊल
सिंगापूर पोलीस अपघाती मृत्यूच्या दिशेने तपास करत असताना, आसाम पोलिसांच्या विशेष तपास पथकाने गेल्या आठवड्यात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये झुबीन गर्ग यांचे सचिव सिद्धार्थ शर्मा आणि आयोजक श्यामकानू महंत यांच्यासह चार जणांवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे. यामुळे या प्रकरणातील गूढ अधिक वाढले आहे.
या तपासानंतर आसाममध्ये सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "हे दोषारोपपत्र न्यायासाठी नसून चारित्र्यहननासाठी आहे. मुख्यमंत्री सरमा यांचा एकमेव उद्देश झुबीन गर्ग यांची प्रतिमा मलिन करणे हा आहे. यासाठी ते त्यांच्या कुटुंबाला ब्लॅकमेल करण्यापर्यंत जाऊ शकतात. झुबीन दा आसामचे कांचनगंगा होते, त्यांचा वारसा कोणालाही पुसू दिला जाणार नाही," असे गोगोई यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, सिंगापूर पोलीस आणि आसाम पोलीस यांच्या परस्परविरोधी दाव्यांमुळे हे प्रकरण आता अत्यंत संवेदनशील बनले आहे. सिंगापूरमधील कोरोनर चौकशीत काय निष्पन्न होते, याकडे संपूर्ण देशाचे आणि झुबीन गर्ग यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.