Special Ops 2: हिम्मत सिंग इज बॅक! 'स्पेशल ऑप्स सीझन २'ची घोषणा, के के मेनन 'या' अभिनेत्याशी भिडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 17:40 IST2025-05-15T17:40:04+5:302025-05-15T17:40:41+5:30
'स्पेशल ऑप्स सीझन २'ची घोषणा झाली असून यावेळी के के मेननसोबत अनेक नवीन कलाकारांची फौज दिसणार आहे.

Special Ops 2: हिम्मत सिंग इज बॅक! 'स्पेशल ऑप्स सीझन २'ची घोषणा, के के मेनन 'या' अभिनेत्याशी भिडणार
के के मेनन यांची प्रमुख भूमिका असलेल्या स्पेशल 'स्पेशल ऑप्स' वेबसीरिजची चांगलीच चर्चा झाली. लॉकडाऊनच्या काळात या वेबसीरिजला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. याशिवाय 'स्पेशल ऑप्स १.५' या वेबसीरिजमधून हिम्मत सिंग कसा घडला हेही पाहायला मिळालं. आता नुकतीच जिओ + हॉटस्टारने 'स्पेशल ऑप्स सीझन २'ची (special ops 2) घोषणा केली आहे. के के मेनन पुन्हा एकदा कर्तव्यदक्ष आणि तडफदार अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'स्पेशल ऑप्स सीझन २'ची घोषणा
जिओ+हॉटस्टार या ओटीटीच्या सोशल मीडिया पेजच्या माध्यमातून 'स्पेशल ऑप्स सीझन २'ची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये दिसतं की Raw च्या मुख्यालयात पुन्हा एकदा सर्व अधिकारी एका मिशनसाठी सज्ज होतात. हिम्मत सिंग त्याच्या सर्व साथीदारांना घेऊन मिशन लीड करतो. विनय पाठक, सय्यामी खेर हे हिम्मत सिंगचे सहकारी विविध ठिकाणी शत्रूंना नेस्तनाबूत करताना दिसतात. अशातच अभिनेते प्रकाश राज यांची छोटीशी झलक दिसते. एकूणच यावेळी के के मेनन आणि प्रकाश राज हे एकमेकांना भिडताना दिसणार आहेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
कधी रिलीज होणार 'स्पेशल ऑप्स सीझन २'?
जिओ+हॉटस्टारने 'स्पेशल ऑप्स सीझन २'ची झलक दाखवणारा हा व्हिडीओ शेअर केलाय. परंतु सीरिजची तारीख अद्याप रिव्हिल करण्यात आली नाही. त्यामुळे पुढील एक-दोन महिन्यांमध्ये 'स्पेशल ऑप्स सीझन २' रिलीज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सीरिजमध्ये के के मेनन पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत आहे. त्यासोबत विनय पाठक, सय्यामी खेर, ताहिरराज भासीन, दलीप ताहिल, गौतमी कपूर हे कलाकारही दिसणार आहेत. सर्वांना 'स्पेशल ऑप्स सीझन २' पाहण्याची उत्सुकता आहे.