"मीम्समुळे आमच्या वयाचे कलाकार चर्चेत...", असं का म्हणाल्या रेणुका शहाणे? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 09:38 IST2025-03-07T09:36:11+5:302025-03-07T09:38:55+5:30
आजच्या काळात स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर...रेणुका शहाणे स्पष्टच बोलल्या

"मीम्समुळे आमच्या वयाचे कलाकार चर्चेत...", असं का म्हणाल्या रेणुका शहाणे? वाचा...
अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) हे नाव आलं की आठवतो तो 'हम आपकै है कौन' सिनेमा. या सिनेमामुळे ती सर्वांची लाडकी 'भाभी' बनली. सलमान-रेणुकाचं देवर-भाभीचं नातं हिट झालं होतं. आजही रेणुकाला याच सिनेमामुळे ओळख मिळते. दरम्यान रेणुका 'दुपहिया' या वेबसीरिजमध्ये झळकत आहे. एका गावाची ही हलकी फुलकी कहाणी असणार आहे. नुकतंच रेणुका यांनी सीरिजनिमित्त आजच्या काळात स्पर्धेत टिकून राहण्यासंदर्भात भाष्य केलं.
आजकाल कशाचेही मीम्स बनत आहेत. यामुळे सोशल मीडियावर ट्रोल होणं किंवा चर्चेत येणं वाढलं आहे. नुकतंच रेणुका शहाणेंना याबाबतीत विचारण्यात आलं. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्या गंमतीत म्हणाल्या, "मला तर उलट हे मीम कल्चर आवडतं. हे पॉप आर्ट सारखं आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गोष्टी वेगळ्या अंदाजात पोहोचतात हे याचं वैशिष्ट्य आहे."
त्या पुढे म्हणाल्या, "कलाकार म्हणून तुम्हाला या सर्व गोष्टींशी जुळवून घ्यावं लागतं. आजच्या काळात तुम्हाला सर्व प्लॅटफॉर्मवर अपडेट राहावंच लागतं. नाहीतर तुम्ही आऊटडेटेड होता. मग भलेही तुम्ही कितीही मोठ्या आणि गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं असेल तुम्ही अपडेट नसाल तर जुनेच होऊन जाता. एका वयानंतर या मीम्सच्या गोष्टी कलाकारांना चर्चेत ठेवतात. नाहीतर आपल्या समाजात वयानुसार भेदभाव केला जातो. विशिष्ट वयानंतर तुम्हाला कोणी विचारत नाही. मग तुमच्यात कितीही टॅलेंट असलं तरी वयामुळे तुम्हाला किंमत मिळत नाही. मात्र हे मीम्स तुम्हाला सतत चर्चेत ठेवण्याचं काम करतात."
रेणुका शहाणेची 'दुपहिया' ही वेबसीरिज 'पंचायत' सीरिजसारखाच फील देणारी आहे. ॲमेझॉन प्राईमवर सीरिज प्रदर्शित झाली आहे. यामध्ये गजराज राव, भुवन अरोरा, स्पर्श श्रीवास्तव, शिवानी रघुवंशी, यशपाल शर्मा या कलाकारांचीही मुख्य भूमिका आहे.