मनोज वाजपेयी नव्हे तर 'हा' अभिनेता होता 'द फॅमिली मॅन'साठी पहिली पसंती, 'छावा'मध्ये केलंय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 14:05 IST2025-12-03T14:04:38+5:302025-12-03T14:05:28+5:30
द फॅमिली मॅन वेबसीरिजसाठी मनोज वाजपेयीच्या आधी एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला विचारणा झाली होती. पण त्याने नकार दिला. कोण होता हा अभिनेता?

मनोज वाजपेयी नव्हे तर 'हा' अभिनेता होता 'द फॅमिली मॅन'साठी पहिली पसंती, 'छावा'मध्ये केलंय काम
प्राइम व्हिडिओची सुपरहिट स्पाय ॲक्शन थ्रिलर सिरीज 'द फॅमिली मॅन' प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या सीरिजमध्ये अभिनेता मनोज वाजपेयीने साकारलेलं 'श्रीकांत तिवारी' हे पात्र प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरलं. मात्र, या भूमिकेसाठी मनोज वाजपेयी ही निर्मात्यांची पहिली निवड नव्हती. श्रीकांत तिवारीसाठी 'छावा' सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्याला कास्ट करण्यात येणार होतं. कोण होता तो अभिनेता?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'द फॅमिली मॅन' सीरिजच्या निर्मात्यांची पहिली पसंती अभिनेता अक्षय खन्ना होता. निर्मात्यांनी अक्षय खन्नासोबत या भूमिकेबद्दल चर्चादेखील केली होती. मात्र मानधनाच्या रकमेमुळे दोघांमध्ये एकमत होऊ शकले नाही. जर पैशांच्या बाबतीत अक्षय खन्ना आणि निर्मात्यांचं एकमत झालं असतं, तर 'द फॅमिली मॅन' मधील 'श्रीकांत तिवारी'च्या भूमिकेत आज मनोज वाजपेयी नव्हे, तर अक्षय खन्ना दिसला असता.
'द फॅमिली मॅन 3' ची चर्चा
'द फॅमिली मॅन'चे आतापर्यंत तीन सीझन प्रदर्शित झाले आहेत. पहिला सीझन २०१९ मध्ये, तर दुसरा सीझन २०२१ मध्ये आला होता. तिसरा सीझन काहीच दिवसांपूर्वी चाहत्यांच्या भेटीला आला. 'द फॅमिली मॅन ३' मध्ये मनोज वाजपेयी पुन्हा एकदा श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत दिसला. तर खलनायक म्हणून अभिनेता जयदीप अहलावत झळकला. तिसरा सीझनही प्रेक्षकांना चांगलाच आवडलेला दिसतोय.
अक्षय खन्नाच्या धुरंधरची उत्सुकता
दरम्यान, अक्षय खन्नाने या वर्षी 'छावा' चित्रपटात औरंगजेबची भूमिका साकारली. अक्षयच्या या भूमिकेचं खूप कौतुक झालं. आता अक्षय खन्नाच्या आगामी 'धुरंधर' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमात रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत असून आदित्य धरने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. अक्षय, रणवीरसोबत अभिनेता आर. माधवन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन हे कलाकारही सिनेमात झळकणार आहेत.